सिंधुदुर्गवासीयांच्या गणेशोत्सवाला आनंदाचे उधाण! | पुढारी

सिंधुदुर्गवासीयांच्या गणेशोत्सवाला आनंदाचे उधाण!

सिंधुदुर्ग; विवेक गोगटे : भाद्रपद असे नाव प्राप्त झाले. याला नभस्य असेही नाव आहे. श्रावणापासून ज्या मासाची उत्सुकतेने वाट पाहिली जाते तो हा महिना. समस्त हिंदूधर्मिय, त्यातही मराठी माणसांच्या आनंदाला गणेशभक्तीचे उधाण आणण्याचे काम हा भाद्रपद महिना करतो. कारण या महिन्यात भगवान श्रीगणेशाचे घराघरात आगमन होते. शिवपार्वतीचा पुत्र म्हणून श्री गजानन गणेशाने भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जन्म घेऊन त्या महिन्याचे महत्व वाढवले आहे. भाद्रपद महिन्याला रविवार 28 ऑगस्टपासून सुरुवात होत असून बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी भक्तगण सज्ज झाले आहेत.

भाद्रपद चतुर्थीला श्री गणेशाची पार्थिव पूजा केली जाते. मात्र त्यापूर्वी भाद्रपद तृतीयेला हरितालिकेचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. हे व्रत फक्त स्त्रियांसाठीच असते. वयाच्या दुसर्‍या वर्षापासून हे व्रत करण्यास प्रारंभ करतात असे सांगितले जाते. या दिवशी मुली व स्त्रिया उपवास करतात. सकाळी तीळ व आवळ्याचे चूर्ण केसांना व अंगाला लावून आंघोळ करून धूतवस्त्र नेसून पूजा केली जाते. सर्वगुणसंपन्न पती मिळावा म्हणून कुमारिका हे व्रत करतात व मिळालेला पती दीर्घायुषी व आरोग्य संपन्न राहावा यासाठी सुवासिनी हे व्रत करतात. तर पुनर्जन्मात अखंड सौभाग्य मिळावे म्हणून विधवा स्त्रियासुद्धा फक्त उपवास करतात. यावर्षी 30 ऑगस्ट रोजी हरितालिका व्रत आहे.

गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असून पौराणिक कथेनुसार गणपतीचा जन्म गणेश चतुर्थी दिवशी झाला. यादिवशी गणपतीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांचे दुःख दूर होते असे मानले जाते. तळकोकणात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. सुमारे 95 टक्के घरांमध्ये श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते. उर्वरित कुटुंबांचे गणराज मूळ घरात स्थानापन्न होतात व त्या ठिकाणी एकत्रित परंपरेनुसार दीड, पाच, सात, दहा, अकरा, एकविस दिवस गणेशाची सेवा केली जाते. गणेशोत्सवाची सुरुवात 31 ऑगस्ट रोजी होणार आहे.

भाद्रपद शुद्ध पंचमीस ऋषिपंचमी हे व्रत करतात. वर्षभर केलेल्या पापांचे परिमार्जन या व्रताने होते असे सांगितले आहे. स्वनिर्मित नांगरट न केलेल्या जमिनीतील अन्न यादिवशी खावे, असे सांगितले जाते. कारण ऋषिमुनी कुठल्याही प्राण्याचे सहाय्य न घेता अन्न पिकवीत असत. ज्या ऋषींनी वेदांचे प्रकटीकरण जतन केले आणि त्याचा अर्थ सामान्य जनतेपर्यंत पोहोचविला अशा ऋषींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ऋषिपंचमी व्रत करतात. ऋषींच्या अंगी असलेल्या पवित्रतेमुळे या दिवशी संपूर्ण वर्षभर केलेल्या पापांचे किंवा अशुचीचे परिमार्जन होते असे मानतात. यावर्षी 1 सप्टेंबर रोजी ऋषिपंचमी होणार आहे. भाद्रपद शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. ज्येष्ठ नक्षत्रावर तिथे पूजन करून, मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन केले जाते. यादिवशी लक्ष्मीची ज्येष्ठ भगिनी अलक्ष्मी तिचे पूजन केले जाते. यावर्षी 3 सप्टेंबर रोजी गौरीचे आवाहन, रविवार 4 सप्टेंबर रोजी गौरीचे पूजन व सोमवार 5 सप्टेंबर रोजी गौरीचे विसर्जन होईल. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीस अनंताचे व्रत केले जाते. कोणाला रस्त्यामध्ये, वाटेमध्ये जर अनंताचा दोरक सापडल्यास किंवा कोणी अनंतव्रताची पूजा मागून घेतली असेल तरच त्या त्या लोकांकडे अनंत चतुर्दशी दिवशी अनंताची पूजा करतात. अनंताची पूजा होईपर्यंत त्या घरातील गणपती विसर्जन करीत नाहीत. यावर्षी शुक्रवार 9 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी व्रत होणार आहे.

भाद्रपदातील श्री गणेश उत्सवासंबंधी काही नियम श्री गणेशाची मूर्ती गणेश चतुर्थीच्या आठ ते दहा दिवस आधी आणून घरी ठेवता येते. ती आदल्या दिवशीच घरी आणावी असे नाही. तसेच मूर्ती बाजारातून किंवा गणेशचित्र शाळेतून घरी आणण्यासाठी दिवस पाहण्याची आवश्यकता नसते भाद्रपद महिन्यातील पार्थिव गणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट वेळ, मुहूर्त नाही. प्रातः कालापासून मध्यांन्हापर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजन करता येते. उजव्या सोंडेचा गणपती कडक सोवळ्याचा आणि डाव्या सोंडेचा गणपती सौम्य अशी समजूत चुकीचे आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी श्री गणेश स्थापना, पूजन करणे शक्य नसल्यास त्यानंतर करू नये. एखाद्या वर्षी लोप झालेला चालेल. गणपती स्थापना झाल्यावर अशौच आल्यास दुसर्‍याकडून लगेच गणपती विसर्जन करून घ्यावे. एखाद्या वर्षी उत्सवाचे दिवस कमी झालेले चालतील. घरामध्ये गर्भवती स्त्री असता गणेश मूर्तीचे विसर्जन करता येते. अशा वेळेस मूर्ती विसर्जन न करण्याची रुढी गैरसमजुतीमुळे आहे. श्री गणेश मूर्तीचे विसर्जन मंगळवारी (कोणत्याही वारी) तसेच कोणतेही नक्षत्र असताना करावे. गौरीपूजन : भाद्रपदातील गौरी काही जणांकडे उभ्या असतात. तांब्यावर, सुगडावर किंवा खड्यांच्या असतात. जसा कुलाचार असेल त्याप्रमाणे गौरीपूजन करावे. घरातील एखादी व्यक्ती विशेषतः आई किंवा वडील मृत झाल्यावर एका वर्षाचे आत (नेहमीप्रमाणे) कुलाचाराप्रमाणे गौरी पूजन करावे. काही ठिकाणी अशा वेळेस गौरी उभ्या न करता पाटावर, सुगडावर बसविण्यास सांगितले जाते. यास कोणताही आधार नाही. केवळ भावनेपोटीआणि गैरसमजुतीमुळे सांगितले जाते. अशा वेळेस उभ्या गौरीचे पूजन नेहमीप्रमाणे करावे. गौरी विसर्जन मूळ नक्षत्रावर करावयाचे असल्याने मंगळवारी/शुक्रवारी तसेच कोणत्याही वारी करता येते.

Back to top button