गांजा बाळगल्याप्रकरणी बार्शीत महिलेसह दोघांना अटक | पुढारी

गांजा बाळगल्याप्रकरणी बार्शीत महिलेसह दोघांना अटक

बार्शी ; पुढारी वृत्तसेवा : विक्री करण्याच्या उद्देशाने 21 किलो गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी बार्शीतील एका महिलेसह दोघांना ताब्यात घेतले. रविवारी (दि. 31) रात्रीच्या सुमारास पोलिसांनी बार्शी-कुर्डुवाडी बाह्यवळण रस्त्यावरील कॅनॉलजवळ ही कारवाई केली. त्यांच्याकडून गांजा, दुचाकी, मोबाईल असा 1 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

दुर्गा दीपक हाजगुडे (वय 30, रा. नाळे प्लॉट, बार्शी व तानाजी माने (वय 32, रा. तुळजाभवानी कारखान्याजवळ नळदुर्ग, ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद)अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांना आज बार्शी न्यायालयात उभे केले असता तीन नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पोलिसांना खबर्‍यामार्फत दुचाकीवरून दोघेजण गांजा घेवून विक्रीसाठी बाह्यवळण रस्त्यावरील कॉलेजजवळ असलेल्या कॅनॉल जवळ येणार आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, कर्मचारी रवि लगदिवे, रेवनाथ भोंग, अर्जुन गोसावी, चेतन झाडे, नगरपालिकेचे दिनेश पवार यांनी सापळा लावला.

त्यावेळी रस्त्याच्या बाजुस अंधारामध्ये दुचाकीसोबत महिला व एक व्यक्ती अंधारामध्ये उभे असलेले दिसले. त्यामुळे पोलिसांनी जवळ जावुन चौकशी केली. त्यावेळी दोघेही उडवा उडवीची उत्तरे देवू लागले. त्यामुळे पोलिसांनी तपासणी केली असता दुर्गा हाजगुडे व तानाजी माने त्यांची नावे असून, दुचाकीच्या (क. एम. एच. 13 डी.पी. 5386) मधोमध एकावर एक अश्या दोन पांढर्‍या रंगाच्या नायलॉनच्या गोण्या असल्याचे दिसून आले.

त्यांची कसून चौकशी करता त्या दोघांनी गोण्यांमध्ये गांज्या आहे असे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी वाहनांच्या उजेडात व व बॅटरीच्या उजेडात पंचासमक्ष पंचनामा केला. त्या दोघाजवळ दोन मोबाईल मिळून आले व बाजूस गाडीवरील नायलॉनच्या दोन पिशव्या होत्या. त्या उघडून पाहिल्या असता त्यातून उग्र वास येणारा गांज्या सदृश्य पदार्थ आढळून आला. तो माल कोठून आणला याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरचा हा गांजा पंढरपूर येथून आणला असल्याचे सांगितले.

दोघांवर बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रामदास शेळके हे करीत आहेत.

Back to top button