गोरेगावमधील एका वसुलीप्रकरणात सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

गोरेगावमधील एका वसुलीप्रकरणात सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात

मुंबई; पुढारी वृत्तसेवा:  गोरेगावमधील एका वसुलीप्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला ताब्यात घेतले आहे. याच प्रकरणात गुन्हे शाखेच्या मागणी अर्जावरुन न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह अन्य दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरुन, पोलिसांनी परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सध्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे आहे.

गुन्हे शाखेने याप्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (एनआयए) अटक केलेल्या सचिन वाझे याचा ताबा मिळवण्यासाठी विशेष एनआयए न्यायालयात अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने दिलेल्या परवानगीनंतर गुन्हे शाखेने सोमवारी (दि.१) रोजी सकाळी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात जावून सचिन वाझे याचा ताबा घेतला.

दरम्यान, गुन्हे शाखेने बजावलेल्या समन्सनंतर परमबीर सिंग यांच्यासह अन्य दोन आरोपी चौकशीला हजर राहिले नव्हते. त्यामुळे गुन्हे शाखेने दंडाधिकारी न्यायालयात धाव घेत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यासाठी अर्ज केला होता. त्यावरील सुनावणीनंतर न्यायालयाने परमबीर सिंग यांच्यासह अन्य दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : बेसनाच्या लाडूची रेसिपी | Besan Ladoo

Back to top button