नागपूर : वीज कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल | पुढारी

नागपूर : वीज कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला व शिवीगाळ करणाऱ्या वीजग्राहक महिला तसेच तिच्या मुलावर अजनी पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, मानेवाडा उपविभागांतर्गत भगवाननगर भागात वीज बिलांच्या वसुलीसाठी महावितरणचे सुधीर चौधरी, सुधीर जंजाळ, प्रदीप टेंभुर्णे, विनोद लोहकरे, राहुल वैरागडे, विक्रांत वाटकर, हेमलता राऊत व कोमल पाटील हे कर्मचारी शनिवारी गेले होते.

कुकडे लेआउट येथे प्लॉट क्रमांक १०६ येथील रहिवासी कमाबाई शंकर बैस यांच्याकडे ४ हजार ६७५ रुपयांची वीजबिलाची थकबाकी होती. यामुळे त्यांचे नाव जानेवारी २०२० पासून थकबाकीदारांच्या यादीत येत होते.

थकबाकी भरण्याबाबत संबंधित ग्राहक कमाबाई शंकर बैस हिला ११ ऑगस्ट, ११ सप्टेंबर व १२ ऑक्टोबरपर्यंत वीजबिलाची थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असा एसएमएस देण्यात आला होता. तरीही तिने थकबाकी न भरल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली.

लोखंडी राॅडने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण

यावेळी कमाबाई बैससह त्याच्या मुलाने कारवाईत अडथळा आणला. मुलाने लोखंडी राॅडने महावितरणचे कर्मचारी सुधीर जंजाळ व सुधीर चौधरी यांच्यावर हल्ला करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांना देखील शिवीगाळ केली. या घटनेची माहिती मिळताच नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके व नागपूर शहर मंडलचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, महाल विभागाचे कार्यकारी अभियंता समीर टेकाडे यांनी महावितरणच्या पथकाची त्वरित भेट घेतली. आणि या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावे असे निर्देश दिले.

याच दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झोन चारचे पोलिस उपायुक्त नुरुल हसन यांची भेट घेऊन आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. यानंतर सुधीर चौधरी यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी कमाबाई बैस व तिच्या मुलावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button