करमाळा; पुढारी वृत्तसेवा : कारमध्ये अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा उलगडा करमाळा पोलिसांनी केला आहे. अनैतिक संबंधातून मित्रांनीच खून केल्याचा प्राथमिक निष्कर्ष करमाळा पोलिसांनी काढला असून एकास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा करमाळा पोलिसांनी २४ तासात तपास लावल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.
श्रावण रघुनाथ चव्हाण (वय३९. रा, अडसुरेगाव ता.येवला जिल्हा नाशिक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत संभाजी रघुनाथ चव्हाणयांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. मयताचा मित्र सुनील घाडगे, त्याची पत्नी व सुनील याचा भाऊ (सर्व रा.अंदरसुळ ता.येवला जिल्हा नाशिक) असे संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबतची मिळालेली माहिती अशी की, अहमदनगर टेभूर्णी महामार्गावर औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ कुकडी वितरिके परिसरात दि.६ जून रोजी सायंकाळी एका कारमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. याची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी घटनास्थळ धाव घेत पाहणी केली व तात्काळ छडा लावत हा खून असल्याचा निष्कर्ष काढला. सर्व परिस्थितीचा अभ्यास करून मृतदेह हा नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील असल्याचे शोधून काढले.
यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील, पोलिस निरिक्षक ज्योतिराम गुजंवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एम एन जगदाळे, चंद्रकांत ढवळे, तौफिक काझी, अमोल जगताप, सिध्देश्वर लोंढे आदिच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
अनैतिकसंबंधातून हा खून झाला आहे. खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हा मृतदेह करमाळा येथे आणला होता. मात्र, कारला व मृतदेहाला आग पुर्ण लागली नसल्याने मृतदेह अर्धवट जळाला. तब्बल दोन दिवस व एक रात्र कारमध्येच मृतदेह राहिल्याने तो ओळखण्यापलीकडे मृतदेहाची अवस्था झाली होती. मृतदेह आढळून आल्यानंतर करमाळा पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्र फिरवत संशयित आरोपीचाही उलगडा केला. याबाबत करमाळा पोलिसांनी तिघांविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एम एन जगदाळे हे तपास करत आहे.
हेही वाचा;