Shivrajyabhishek Din 2023: विशाळगडावर शिवराज्याभिषेक दिन उत्साहात | पुढारी

Shivrajyabhishek Din 2023: विशाळगडावर शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : ‘झांज पथकाचा दणदणाट.., पारंपरिक वाद्यांचा गजर…शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके… भगवे फेटे आणि पारंपरिक वेशात सहभागी झालेल्या महिला भगिनी…भगवे झेंडे फडकावित सहभागी झालेले तरुण…अनd फुलांच्या पायघड्यांवरून छत्रपती शिवरायांच्या पालखीचे तसेच मूर्तीचे आगमन…त्यांचे तुतारींच्या निनादात स्वागत… ‘तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ, जय शिवराय’च्या गर्जना करीत  निघालेल्या मिरवणुकीने किल्ले विशाळगड (Shivrajyabhishek Din 2023) येथे मराठा तितुका मेळवावा, प्रतिष्ठान कोल्हापूरच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा करण्यात आला.

येथील पंतप्रतिनिधी राजवाड्याच्या मंडपात शिवप्रतिमेवर संघटनेचे प्रमुख रणजित घरपणकर यांनी अभिषेक घातला. पुजारी निलेश हर्डिकर यांनी मंत्रोच्चार केला. यावेळी शिवकालीन मर्दानी युद्धकला खेळाची प्रात्यक्षिके, पोवाडे सादर करण्यात आले. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मूर्तीला दुग्धभिषेक, जलाभिषेक आणि फुलाभिषेक घालून राज्याभिषेक सोहळा विधिवंत आणि थाटामाटात पार पडला. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय’ हर हर महादेव, जय जिजाऊ जय शिवराय, जय भवानी जय शिवाजी’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक ध्येय-मंत्र, प्रेरणा मंत्र आणि आरती करून हलगी-खेताळ-शिंगच्या निनादत शिवरायांच्या जयघोषात शिवराज्याभिषेक करण्यात आला. यावेळी काही चिमुकल्यांनी शिवचरित्रावर आधारित पोवाड्याचे गायन करत उपस्थितांची मने जिंकली. (Shivrajyabhishek Din 2023)

प्रारंभी सकाळी गडाच्या पायथ्याला मर्दानी खेळांचे सादरीकरण झाले. यावेळी शिवप्रतिमेच्या पालखीचे  पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पायथा ते भंगवंतेश्वर मंदिर व पुढे राजवाडा दरम्यान सवाद्य पालखी मिरवणूक झाली. यावेळी वैभव बादल, प्रतीक्षा बादल, जयाजी मोहीते, आबासाहेब नाईक, धैर्यशील विचारे, डॉ. शितलताई मालूसरे आदी वंशजाचा  स्मृतीचिन्ह, शाल देऊन गौरव करण्यात आला.  इचलकरंजी येथील वाद्यसंस्कार, रणमर्द शिलेदार, झांज पथक, चाणाक्य आखाडा यांच्या कार्यकर्त्यांनी सोहळ्याची शोभा वाढवली. लेझीम खेळ ढोल वादनाने मिरवणुकीत चैतन्य फुलवले.

यावेळी उपाध्यक्ष विनायक करंबे, योगेश केळकर, किशोर देसाई, अनिल चिले, ऋषिकेश देसाई, माजी सरपंच संजय पाटील, बंडू वेल्हाळ, माणिक पाटील, महेश विभुते, सुरेश पटेल आदी प्रमुख उपस्थित होते. गड परिसरात शाहूवाडी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली. विशाळगडसह, गजापूर, दिवाणबाग येथील ग्रामस्थ सहभागी झाले होते. रात्री आठनंतर मुंढा दरवाजा येथे नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली.

हेही वाचा 

 

Back to top button