दापोली; पुढारी वृत्तसेवा : गेले अनेक दिवस उत्कंठा शिगेला पोहोचलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरू पदाची निवड पूर्ण झाली आहे. विद्यापीठाच्या पंधराव्या कुलगुरू पदी डॉक्टर संजय भावे याचे नावाची घोषणा राजभव येथून करण्यात आली आहे. (Konkan Krishi Vidyapeeth)
मार्च महिन्यात सुरू करण्यात आलेली ही कुलगुरू निवडीची प्रक्रिया दि ६ जून रोजी पूर्ण झाली आहे. राज्यपाल महोदयांकडे याबाबत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. त्यातून भावे यांची निवड करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस यांनी या मुलाखती घेतल्या. या मुलाखती घेतल्यानंतर कुलगुरू पदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करून भावे यांचे नाव घोषित करण्यात आले. (Konkan Krishi Vidyapeeth)
तूर्तास या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू पदाचा कार्यभार एस.एन.डी.टी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांच्याकडे होता.मागील रविवारी कुलगुरू निवड समिती समोर पंचवीस इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या पंचवीस जणांमधून पाच जणांची निवड करून निवड समितीने पाच नावांची शिफारस राज्यपाल महोदयांकडे केली होती.
कुलगुरू पदाच्या निवडीसाठी राज्यपाल महोदयांकडून नियुक्त करण्यात आलेल्या शोध समितीच्या अध्यक्षपदी कृषी अनुसंधान परिषदेचे निवृत्त डायरेक्टर जनरल डॉ.एस. अय्यप्पन तर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहसंचालक डॉ. पी. एन. साहू यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. तसेच अन्य दोन ते तीन कृषी शास्त्रज्ञांचा या समितीमध्ये समावेश होता.