सोलापूर : कविता सुळे खून प्रकरणी दोन आरोपींना जन्मठेप तर दोन आरोपींना सक्त मजुरी | पुढारी

सोलापूर : कविता सुळे खून प्रकरणी दोन आरोपींना जन्मठेप तर दोन आरोपींना सक्त मजुरी

माळशिरस; पुढारी वृत्तसेवा : सुळेवाडी तालुका माळशिरस येथील कविता सुळे हिच्या खून प्रकरणी तिचे वडील विठ्ठल सुळे व सहकारी संतोष मदने यांना जन्मठेप तर छाया सोनलकर व संगीता सुळे यांना दोन वर्ष सक्तमजुरी शिक्षा माळशिरस जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी (दि.२४) सुनावली.

याबाबत माहिती अशी की, कविता विठ्ठल सुळे (रा. सुळेवाडी, ता.माळशिरस) हिचा 31 मार्च 2013 रोजी मृत्यू झाला व तिचा अंत्यविधी ही करण्यात आला होता. या घटनेबाबत पिलीव पोलीस स्टेशनला एक निनावी पत्र आले होते. त्या पत्रावरून पोलिसांनी तपास करून मृत कविता हिचे वडील विठ्ठल सुळे यांना ताब्यात घेऊन तपास केला असता विठ्ठल सुळे यांनी आपण संतोष मदने यांच्या मदतीने कविताचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकूण दहा आरोपींना अटक केली होती.

या आरोपी विरुद्ध माळशिरस जिल्हा न्यायालयात उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांनी तपास करून दहा आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणी दरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला होता. या खटल्यात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी तपास अधिकारी संजय पाटील व फिर्यादी अंकुश इंगळे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. या खटल्यात साक्षीदाराच्या साक्षी व सरकारी वकील अॅड. संग्राम पाटील व अॅड. एस. ए. ढवळे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने विठ्ठल सुळे व संतोष मदने यांना शुक्रवारी जन्मठेपेची तर छाया सोनलकर संगीता सुळे यांना दोन वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. तर यामधील पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात कोर्ट पैरवी म्हणून एम. डी. शिंदे व एएसआय पाडुळे यांनी काम पाहिले. आरोपी तर्फे अॅड. प्रशांत लोमटे (सातारा) यांनी काम पाहिले.

अधिक वाचा :

Back to top button