संसद आणि संसदेबाहेर निर्भयपणे बोलण्याची किंमत राहुल गांधी यांनी मोजली : अभिषेक मनू सिंघवी | पुढारी

संसद आणि संसदेबाहेर निर्भयपणे बोलण्याची किंमत राहुल गांधी यांनी मोजली : अभिषेक मनू सिंघवी

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : संसद आणि संसदेबाहेर निर्भयपणे बोलण्याची किंमत राहुल गांधी यांनी मोजली असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी शुक्रवारी गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

राहुल गांधी यांच्या कार्यामुळे बिथरलेल्या भाजपने त्यांचा आवाज दाबण्यासाठी नवनवे तंत्र अवलंबले असल्याचे सांगून सिंघवी म्हणाले की, राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती मिळेल आणि त्यायोगे त्यांची खासदारकी सुद्धा शाबूत राहील, असा आमचा विश्वास आहे. कायद्यावर आमचा विश्वास आहे. पुढील काळात आम्ही नक्की विजयी होऊ. कायद्याच्याही आधी हा मुद्दा राजकारणाचा आहे. हा व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे.

भाजपच्या सत्ता काळात सरकारी संस्थांचे दमन केले जात आहेच पण त्यांचा सर्रास दुरूपयोग केला जात आहे. राहुल गांधी हे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांवर उघडपणे बोलत आहेत व याचे परिणामही ते भोगत आहेत. गांधी हे तथ्यावर बोलतात. मग विषय नोटाबंदीचा असो, चीनचा असो अथवा जीएसटीचा असो. ते सातत्याने आवाज उठवत आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज दाबला जात आहे. राहुल हे विदेशात गेले तरी प्रश्न उपस्थित केले जातात. बनावट राष्ट्रवादाच्या नावाखाली त्यांना बोलू दिले जात नाही, असा आरोप सिंघवी यांनी केला.

गांधी यांचे सदस्यत्व रद्द होण्याच्या मुद्द्यावर सिंघवी यांनी काही प्रश्न उपस्थित केले. कलम 103 अंतर्गत सदस्यत्व रद्द होण्याचा निर्णय राष्ट्रपतींद्वारे झाला पाहिजे. राष्ट्रपती सुद्धा आधी निवडणूक आयोगाकडून सल्ला घेतात, त्यानंतर काही निर्णय होतो. तथापि या प्रकरणात प्रक्रियेचे पालन करण्यात आले नाही, असेही सिंघवी यांनी सांगितले.

Back to top button