कार्बनडाय ऑक्साईड ने मंगळावर बनेल इंधन | पुढारी

कार्बनडाय ऑक्साईड ने मंगळावर बनेल इंधन

न्यूयॉर्क : मानवासाठी ‘मंगळ’ ग्रह हा नेहमीच उत्सुकतेचा विषय राहिलेला आहे. या लाल ग्रहासंदर्भात गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने संशोधने करण्यात येत आहेत. याशिवाय या ग्रहावर मानवी वस्ती स्थापन करण्याची स्वप्नेही पाहिली जात आहेत. मात्र, मंगळावर जाण्यासाठी व राहण्यास जाण्यापूर्वी अनेक समस्यांचे निराकरण करावे लागणार आहे. यामध्ये मुख्य समस्या म्हणजे इंधनाची आहे.

मंगळावर जाण्या-येण्यासाठी पृथ्वीवरून इंधन न्यावे लागते. ही समस्या निकालात काढण्यासाठी ‘युनिव्हर्सिटी ऑफ सिनसिनाटी’चे इंजिनिअर्स सध्या प्रयत्न करत आहेत. ग्रीनहाऊस गॅसेसना इंधनात बदलण्यासंबंधीचा पर्याय शोधण्याचा हे संशोधक प्रयत्न करत आहेत. यामध्ये यश आल्यास मंगळावर इंधन तयार करण्यासाठीचा पर्याय मिळेल आणि जलवायू परिवर्तन समस्याही निकालात काढण्यास मदत मिळेल.

मंगळावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधनाची गरज असते. जेवढे इंधन मंगळावर जाण्यासाठी लागते, तेवढेच इंधन तेथून येण्यासाठी लागते. सध्याच्या तंत्रज्ञानाचा विचार करता हे इंधन पृथ्वीवरूनच न्यावे लागेल. दरम्यान, ‘यूसी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लाईड सायन्स’चे सहायक प्रोफेसर जिंगजी वू आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी असा एक रिअ‍ॅक्टर तयार केला आहे की,

तो कार्बनडाय ऑक्साईडला मिथेनमध्ये परावर्तीत करू शकतो. मंगळाच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईड आहे. या वायूपासून इंधन तयार केल्यास त्याचा उपयोग मंगळावरून परत येताना होऊ शकतो.

यामुळे पृथ्वीवरून नेण्यात येणारे अर्धे इंधन वाचू शकते. जिंगजी यांनी सांगितले की, मंगळारील रिअ‍ॅक्टर हा गॅस स्टेशनसारखा असेल. यामध्ये तेथील कार्बनडाय ऑक्साईड भरण्यात येईल आणि त्यामधून रॉकेटसाठी इंधन म्हणून लागणारे मिथेन तयार होईल.

Back to top button