

उत्तर सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यासह उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तसेच काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. या वातावरणाचा द्राक्ष, डाळिंब, गहू, हरभरा, या पिकांवर परिणाम होत आहे. द्राक्षाच्या कोवळ्या पानांवर व घडावर डाऊनी, करपा, भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची चिंता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. द्राक्ष बागेला रोगाची लागण होऊ नये, याकरिता शेतकऱ्यांना औषध फवारणी करावी लागत असल्याने औषधांच्या खर्चाचा भुर्दंडही शेतकऱ्यांवर पडत आहे.
परतीचा पाऊस लांबल्याने यावर्षीही द्राक्षाची ऑक्टोबर (पीक) छाटणी उशिराने झाली आहे. सध्या काही ठिकाणी द्राक्षाची विरळणी, फ्लोरिंग स्टेज आदी कामे सुरू आहेत. घडाचा आकार मोठा होण्याकरिता जिब्रेलिक ऍसिड या औषधाची फवारणी करावी लागते; पण ढगाळ हवामानामुळे द्राक्ष घड वाकडे होण्याची भीती असल्याने शेतकरी जिब्रेलिक (जीए) ऍसिड औषधाची फवारणी टाळत आहेत. ढगाळ हवामानाचा फायदा रब्बीतील ज्वारी पिकाला होत असला तरी याचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले मंदौस चक्रीवादळामुळे ही परिस्थिती उद्भवली असून, पुढील काही दिवस हवामान खात्याने ढगाळ हवामान व पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकर्यांचा जीव टांगणीला लागला आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे द्राक्षाला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले होते. आता ही समस्या उद्भवल्याने द्राक्ष बागेला केलेल्या खर्चा एवढेही उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा वाढत आहे.