कोल्हापूरला आज ‘यलो अलर्ट’; मेघगर्जनेसह पावसाची शक्यता | पुढारी

कोल्हापूरला आज ‘यलो अलर्ट’; मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उत्तर केरळ ते मध्य पूर्व अरबी समुद्रापर्यंत तयार झालेली चक्रीय स्थिती तसेच 13 डिसेंबरला किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. या दोन्ही स्थितीमुळे राज्यातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड या भागांत हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जाहीर केला असून मंगळवारी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ तामिळनाडू तसेच आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर धडकले. त्यानंतर ते पृष्ठभागावर सरकल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली. मात्र, त्या चक्रीवादळाचा परिणाम राज्यावर झाला असून, सर्वच भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला होता. मात्र, या पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. चक्रीवादळाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा उत्तर केरळ ते मध्यपूर्व अरबी समुद्रापर्यंत चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्याचा प्रभाव कायम असतानाच 13 डिसेंबर रोजी उत्तर केरळ आणि आसपासच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. या दोन्ही स्थितीच्या प्रभावामुळे कोकणातील सिधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड या भागात ’यलो अलर्ट’ जारी केला आहे. या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मात्र, बुधवारपासून पाऊस कमी होणार आहे. तुरळक ठिकाणीच पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कोल्हापुरात पावसाने ऊस तोडणी खोळंबल्या

कुडित्रे; पुढारी वृत्तसेवा : रविवारी झालेला तुरळक पाऊस, सोमवारचे ढगाळ वातावरण आणि हवामान खात्याने वर्तविलेला पावसाचा अंदाज यामुळे गुर्‍हाळघरे आणि साखर कारखान्यांच्या ऊस तोडणीवर परिणाम झाला आहे. गुर्‍हाळघरांचे जळण भिजण्याचा तर साखर कारखान्यांची यंत्राद्वारे होणारी ऊसतोड थांबण्याचा धोका निर्माण झाला आहे. थंडी कमी झाल्यामुळे साखरेचा उतारा घटण्याचाही धोका आहे. ऊसतोड मजुरांच्या टोळ्या पाल्यात राहिल्या असून त्यांचे हाल होत आहेत. उसात पाणी साचल्यानेे तेथील तोडण्या थांबविल्या आहेत. रस्त्याकडेच्या उसाची तोडणी सुरू आहे. तुरळक पावसामुळे ऊस तोडणी मशिनधारक तेथे मशिन नेण्यास नकार देत आहेत.

जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी

कोल्हापूर : सोमवारी शहर व जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. ढगाळ वातावरणामुळे दिवसभरसूर्यदर्शन झाले नाही. हवेतील गारवा काही प्रमाणात कमी झाला होता. जिल्ह्यातील तापमान 23 अंश सेल्सिअस होते. मंदोस चक्रीवादळामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तुरळक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. शहराच्या काही भागात सकाळी व सायंकाळी पाऊस झाला. जिल्ह्यात अन्यत्रही पावसाने हजेरी लावली.

Back to top button