

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने राज्यात 15 डिसेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ शमताच आता पूर्वमध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे वार्याचा वेग वाढला आहे.
राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात 15 डिसेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.मराठवाड्यात 14, तर विदर्भात 12 डिसेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
किमान तापमानात पुन्हा वाढ
राज्याच्या किमान तापमानात रविवारी अचानक वाढ झाल्याने थंडीचा कडाका कमी झाला आहे. शनिवारी औरंगाबाद शहराचे तापमान 7.5 अंशांवर होते. ते रविवारी दुप्पट 14.6 अंशांवर गेले. तसेच पुणे शहराचे तापमान 8.9 अंशावरून 12.3, तर जळगावचे 8.5 अंशांवरून 15 अंशांवर गेले. राज्यातील सरासरी किमान तापमान 16 अंशांवर गेल्याने थंडीचा जोर कमी झाला आहे.