ऊस परिषद : पंढरपूर येथे ऊस दरासाठी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस परिषद
ऊस परिषद
Published on
Updated on

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर न करताच कारखाने सुरू केले आहेत. साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर न करताच आंदोलन फोडण्याचा जर प्रयत्न केला तर शेतकरी ऊस वाहतूक बंद पाडेल, असा इशारा ऊस दर संघर्ष समितीच्या व ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावतीने दिला आहे.

साखर विक्रीचा किमान हमीभाव (एसएमपी) 3100 वरून 3500 रुपये करावा, सर्व कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करावेत, शेतकऱ्यांना खासगी काट्यावरून वजन करून आणण्याची मुभा द्यावी. देशाला आवश्यक आहे तेवढीच साखर निर्मिती करावी बाकीचे इथेनॉल निर्मिती करावी. त्यामुळे परकीय चलन वाचेल आणि साखरेला 5000 रुपये देणे शक्य होईल, असे सांगत यावर्षी उसाला 3100 रुपये दर मिळाला पाहिजे आणि पहिली उचल 2500 रुपये मिळाली पाहिजे, असा ठराव ऊस परिषदेत करण्यात आला आहे.

ऊस दर न ठरवता कारखानदारांनी गाळप सुरु केले आहे. यामुळे शेतकर्‍यांची लूट सुरु आहे. ही लूट थांबवावी व शेतकर्‍यांच्या उसाला चांगला दर मिळावा. याकरीता सर्व शेतकरी संघटनांनी एकत्रित येत ऊस दर संघर्ष समितीच्या व ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावतीने रविवार दि. 23 रोजी पंढरपूर येथे ऊस परिषदेचे आयोजन केले हाेते. या ऊस परिषदेत सोलापूर जिल्ह्यतील ऊस दर ठरवण्यात येणार आहे आणि तो दर कारखानदारांनी द्यावा या मागणीवर शेतकरी संघटना ठाम असणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील ऊस साखर कारखान्यांनी सध्या गाळप हंगाम सुरु केला आहे. सुमारे 36 साखर कारखाने सुरु झाले आहेत. कारखाना सुरु झाल्याने ऊस गाळपासाठी स्पर्धा लागणार आहे. मात्र, दर देण्यासाठी कारखानदार स्पर्धा लावत नाहीत. त्यामूळे सुरु झालेल्या गाळप हंगामात ऊस उत्पादक शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी रयत क्रांती संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, जनशक्ती शेतकरी संघटना आदी शेतकरी संघटना एकत्रीत आल्या आहेत.

पुणे,सातारा व सांगली जिल्हयात उसाला प्रती टन 2700 रुपये पासून 3300 रूपये भाव मिळतो. तर मग सोलापूर जिल्ह्यातील उसालाही दर मिळावा, अशी भूमिका सर्व शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी घेतली आहे. याकरिता सोलापूर जिल्ह्याची ऊस दर आंदोलन संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे.

ऊस परिषदेत जे काही ठराव होतील, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावर देखील एकजुटीने उतरण्याची हाक शेतकरी संघटनांनी दिली आहे. या ऊस परिषदेत रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष दिपक भोसले, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणकर, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, तालुकाध्यक्ष सचिन पाटिल, समाधान फाटे, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश सचिव माऊली जवळेकर, निवास नागणे, प्रा. सुहास पाटील, सचिन आटकळे, नंदकुमार व्यवहारे, छगन पवार, गोपाळ घाडगे, राहूल बिडवे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमरजीत पाटील, धाडस संघटनेचे शरद कोळी यांनी मार्गदर्शन केले. तसेच महिला आघाडी पदाधिकारी आदीसह सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व उस उत्पादक शेतकरी उपस्थित उपस्थित आहेत. या ऊस दर परिषदेस राष्ट्रवादी किसान सेल, काँग्रेस ओबीसी सेल, आदींसह विविध पक्ष व संघटनानी पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news