बेळगाव : विजेच्या धक्क्याने बालक ठार | पुढारी

बेळगाव : विजेच्या धक्क्याने बालक ठार

खानापूर; पुढारी वृत्तसेवा :  शौचास गेलेल्या बालकाचा जमिनीवर तुटून लोंबकळणार्‍या विद्युतभारित तारेला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना कामशीनकोप (ता. खानापूर) येथे शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. वरुण बस्साप्पा कोलकार (वय 6) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

वरुण आपल्या घराशेजारील मोकळ्या जागेत शौचास गेला होता. यावेळी तुटून खाली लोंबकळणार्‍या विद्युतभारीत तारेला त्याचा स्पर्श झाला. त्याच ठिकाणी तो गतप्राण झाला. उशीर झाला तरी तो परत आला नसल्याने कुटुंबीयांनी बाहेर जाऊन पाहिल्यानंतर तो मृत पावल्याचे दिसून आले. त्याच्या घराशेजारील रुद्रापा गिरिअप्पा चलवादी यांनी निष्काळजीपणा दाखवून धोकादायक रीतीने विद्युत तार घातल्याने हा अपघात घडल्याचा आरोप करत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी आमदार अरविंद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Back to top button