छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार जगाला दिशादर्शक : शरद गोरे | पुढारी

छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार जगाला दिशादर्शक : शरद गोरे

पंढरपूर : पुढारी ऑनलाईन

छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार जगाला दिशा दर्शक असल्याचे मत इतिहास संशोधक व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित १४ व्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनच्या उद्घाटन प्रंसगी उद्घाटक म्हणून गोरे बोलत होते. १८ भाषांमध्ये पारगंत असलेले संभाजीराजे यांनी बुधभूषण, नायिकाभेद, सातशतक, नखशिख या चार ग्रंथाचे लेखन केले. मानवीमूल्यांसह सर्व विषयांवर त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडलेले अलौकिक विचार वैश्विक आहेत. माणसास जगण्याचं नवं आत्मबळ देतात असे मत मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून शरद गोरे यांनी व्यक्त केले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या साहित्याचा व इतिहासाचा प्रसार व प्रचार जगातील सर्व भाषेत झाला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले,

महापुरूषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराज यांचा समावेश राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे झाला नाही. याबद्दल खंत त्यांनी व्यक्त केली. बहूभाषिक व निष्णात साहित्यिक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव मुंबई विद्यापीठास दिले पाहिजे अशी मागणी गोरे यांनी केली. छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेल्या बुधभूषण या ग्रंथाचा मराठी काव्य गोरे यांनी अनुवाद केला आहे.
या संमेलनाच्या उद्घाटन समारंभास छत्रपती व्यंकोजीराजे (तंजावर तामिळनाडू) यांचे १३ वे वशंज युवराज संभाजीराजे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तंजावर संस्थान व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांच्या तंजावर या बहूभाषिक साहित्य संमेलनाचे आयोजन करणार असल्याची घोषणा युवराज संभाजी राजे यांनी या प्रंसगी केली.

संमेलनाध्यक्ष डॉ. शोभा शिरढोणकर, स्वागताध्यक्ष अभिजित पाटील,साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष फुलचंद नागटिळक, साहित्य परिषदॆचे महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ. अमोल बागूल, मराठावाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर, प्रदेश संघटक अमोल कुंभार, सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रा. पंडितराव लोहकरे उपस्थित होते.

ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा इंगोले (सांगोला) यांना छत्रपती संभाजी महाराज साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कार तर राही कदम (परभणी) यांना छत्रपती संभाजी महाराज साहित्यरत्न पुरस्कार व डॉ. अनिता खेबुडकर (निपाणी, बेळगाव) यांना छत्रपती संभाजी महाराज दुर्ग संवर्धन रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राज्यभरातून आलेल्या ४० कवींनी प्रकाश गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कवीसंमेलनात सहभाग नोंदवला. संगीता भाऊसाहेब जामगे, आप्पा फुले, रत्नप्रभा पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संमेलन समारोपावेळी श्रीमंत लखोजीराजे जाधव यांचे वंशज अमरसिंह जाधव, माजी आमदार दत्तात्रय सावंत मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

 

Back to top button