​​WIW vs INDW: टीम इंडियाचा धमाकेदार विजय, विंडिजवर १५५ धावांनी मात

​​WIW vs INDW: टीम इंडियाचा धमाकेदार विजय, विंडिजवर १५५ धावांनी मात
​​WIW vs INDW: टीम इंडियाचा धमाकेदार विजय, विंडिजवर १५५ धावांनी मात

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या आयसीसी महिला विश्वचषक (icc women's world cup) स्पर्धेच्या १० व्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा १५५ धावांनी पराभव करत दणदणीत विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 'प्लेअर ऑफ द मॅच' स्मृती मानधना (१२३) आणि हरमनप्रीत कौर (१०९) यांच्या सहाय्याने ८ बाद ३१७ अशी मोठी धावसंख्या उभारली. याला प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ ४०.३ षटकांत १६२ धावांत गारद झाला. डिआंड्रा डॉटिनने (६२) सर्वाधिक धावा केल्या. भारताकडून स्नेह राणाने ३ बळी मिळवले. आता त्यांचा १६ मार्चला इंग्लंडशी सामना होणार आहे. (​​WIW vs INDW)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. यास्तिका भाटियाने २१ चेंडूत ३१ धावा केल्या, मात्र ती सातव्या षटकात बाद झाली. यावेली ४९ धावांवर बाद झाली. यानंतर कर्णधार मिताली राज (५) आणि दीप्ती शर्मा (१५) याही झटपट तंबूत परतल्या. यावेळी संघाची धावसंख्या १४ षटकांत ७८ होती. येथून पुढे स्मृती मंधानाने हरमनप्रीत कौरसोबत संघाची धुरा सांभाळली आणि चौथ्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली. दोघींनी चौथ्या विकेटसाठी १८४ धावांची भागीदारी केली. भारतासाठी विश्वचषक स्पर्धेतील ही सर्वोच्च भागीदारी ठरली. मंधानाने तिचे पाचवे आणि हरमनप्रीत कौरने चौथे वनडे शतक झळकावले. हरमनप्रीत कौरचे विश्वचषक स्पर्धेतील हे सलग तिसरे शतक आहे. दोन्ही फलंदाजांच्या शानदार खेळीमुळे भारताने ३०० धावांचा टप्पा पार केला आणि विंडिज समोर विजयासाठी ८ विकेट्सच्या मोबदल्यात ३१८ धावांचे लक्ष्य ठेवले. (​​WIW vs INDW)

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने जोरदार सुरुवात केली. सलामीवीर डायंड्रा डॉटिन (६२) आणि हेली मॅथ्यूज (४३) यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. या दोघींनी फटकेबाजी करत १२ षटकात संघाच्या १०० रन्स धावफलकावर झळकावल्या. यानंतर डॉटिन बाद झाली आणि वेस्ट इंडिजचा डाव गडगडला. पुढील ६२ धावांत संपूर्ण संघ अवघ्या ४०.३ षटकांत पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताकडून स्नेह राणाने सर्वाधिक तीन, तर मेघना सिंगने दोन बळी घेतले. (​​WIW vs INDW)

भारतीय संघ तीन सामन्यांतील दुसऱ्या विजयासह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय संघाचा पुढील सामना १६ मार्च रोजी इंग्लंडशी होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news