सोलापूर: क्रियाशीलमधून माने, साठे, माळी यांचे अर्ज बाद | पुढारी

सोलापूर: क्रियाशीलमधून माने, साठे, माळी यांचे अर्ज बाद

सोलापूर: पुढारी वृत्तसेवा सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत माजी आमदार तथा दूध संघाचे माजी चेअरमन दिलीप माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी संचालक दीपक माळी, सिद्धेश्वर अवताडे यांच्यासह 26 उमेदवारी अर्ज क्रियाशील मतदार संघातून बाद करण्यात आले आहेत, तर केवळ 87 उमदेवारांचे अर्ज मंजूर झाले आहेत.मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या उपस्थितीत अजार्र्ंची छाननी झाली. सोमवारी दूध बचाव समितीने 35 अर्जांवर हरकती घेतल्या होत्या. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात आल्यानंतर मंगळवारी माने, साठे, माळी यांचे अर्ज क्रियाशीलमधून बाद झाल्याने खळबळ उडाली.

विशेष म्हणजे समितीने घेतलेले रणजितसिंह शिंदे व योगेश सोपल यांचे अर्ज मात्र वैध झाले. यावर दूध बचाव समितीने न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. क्रियाशीलमधून एकूण 64, महिला प्रतिनिधीमधून 34, अनुसूचित जाती-जमातीमधून 5, इतर मागासवर्गीय प्रतिनिधीमधून 13, भटक्या विमुक्त जाती-जमातीमधून 17, असे एकूण 133 अर्ज आले होते. त्यापैकी क्रियाशीलमधून 21 अर्ज बाद व 43 मंजूर, महिला प्रतिनिधीमधून 2 अर्ज बाद व 32 मंजूर, अनुसूचित जातीमधून 1 बाद 4 मंजूर, इतर मागासमधून 1 बाद व 12 मंजूर, भटक्या विमुक्तमधून 1 बाद व 16 मंजूर, असे 26 अर्ज बाद व 107 अर्ज मंजूर झाले. यामध्ये मंजूर झालेल्यांमध्ये जवळपास 20 दुबार अर्जांचा समावेश आहे. दीपक माळी यांचा क्रियाशीलमधून अर्ज बाद झाला. इतर मागासमधून मंजूर झाला.

26 अर्ज बाद

नारायण गुंड, अलका बंडगर, विकास गलांडे, हणमंत पोटरे, दीपक माळी, दाजी दोलतडे, सिध्देश्वर अवताडे(2), बळीराम साठे, संतोष वावरे, रेवती साखरे, दिलीप माने (2), प्रभाकर कोरे, ललिता लवटे, सरस्वती भोसले, कौशल्या नवले, संताजी पाटील, तायाप्पा गरंडे, संगीता लोंढे, पांडुरंग भाकरे, महिलामधून विजया गुंड, रेवती साखरे, अनुसूचित जाती-जमातीमधून मीराबाई कसबे, इतर मागासवर्गीयमधून भीमराव कोकरे, भटक्या जातीमधून शहाजी पाटील.या प्रमुखांचे अर्ज मंजूर क्रियाशीलमधून योगेश सोपल, मारुती लावटे, भाऊसाहेब दावणे, बबनराव अवताडे, रणजितसिंह शिंदे, औदुंबर वाडदेकर, विजय यलपल्ले, सुरेश हसापुरे, दीपक माळी, प्रभाकर कोरे, अशोक देवकते आदी.

या मुद्द्यांवर घेण्यात आल्या होत्या हरकती

उमेदवार ज्या सभासद संस्थेकडून प्राधिकृत झाला आहे त्या संस्थेच्या संचालक मंडळात नाव नसणे, महिला संस्थेतून पुरुष सभासदाचे अर्ज, संस्थेच्या यादीमध्ये नियमबाह्य अर्ज घालणे, संघाच्या पोटनियमाचे निकष न पूर्ण करणे आदी बाबींवर दूध बचाव समितीने हरकती घेतल्या होत्या. 35 अर्जांवर घेतलेल्या हरकतींपैकी 26 अर्ज बाद, तर 9 अर्ज पात्र झाले आहेत.

क्रियाशील मतदार संघातून माझे अर्ज जरी बाद झाले असले तरी मी वकिलांचा सल्ला घेऊन न्यायालयात जायचे की, नाही याबाबत ठरविणार आहे.
– दिलीप माने,
माजी आमदार

कोरोना काळात दूध घालण्याची अट शिथिल करण्यात आली होती. त्यामुळे या निर्णयाविरूध्द न्यायालयात जाणार आहे.
– दीपक माळी,
मा. संचालक

हेही वाचलतं का 

Back to top button