Kolhapuri Product : बजेटचा कोल्हापूरी तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ, आणि चप्पलला होणार फायदा ! | पुढारी

Kolhapuri Product : बजेटचा कोल्हापूरी तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ, आणि चप्पलला होणार फायदा !

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ, चप्पल अशा अस्सल कोल्हापुरी उत्पादनांच्या प्रमोशनाची संधी निर्माण होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ‘वन प्रॉडक्ट, वन रेल्वेस्टेशन’ या रेल्वेच्या योजनेची घोषणा केली आहे. (Kolhapuri Product)

‘वन प्रॉडक्ट, वन रेल्वेस्टेशन’ या योजनेंतर्गत त्या त्या भागात प्रसिद्ध असलेल्या उत्पादनांचे व वस्तूंचे भारतीय रेल्वे प्रमोशन करणार आहे. यासाठी 400 ‘वंदे भारत’ ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. या योजनेमुळे स्थानिक लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्हा विविध वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. त्या वस्तू त्या जिल्ह्यांची ओळख आहेत. कोकणचा हापूस असो वा सांगली-नाशिकची द्राक्षे, लोणावळ्याची चिक्की असो वा पुण्याची बाकरवडी, सोलापूरची चादर असो की, येवल्याची पैठणी, पालघरचे चिकू असो की, नागपूरची संत्री, या वस्तूंचे ‘वन प्रॉडक्ट, वन रेल्वेस्टेशन’ योजनेमुळे सर्वत्र प्रमोशन होणार आहे.

या योजनेंतर्गत कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ, चप्पल आदी वस्तूंच्या प्रमोशनाची रेल्वेकडून संधी मिळेल. यामुळे या वस्तू देशभरात आणखी लोकप्रिय होण्यास मदत होईल, त्याबरोबरच हक्काची बाजारपेठ मिळेल, त्यातून स्थानिक रोजगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. (Kolhapuri Product)

Kolhapuri product : तीन वर्षांत 400 ‘वंदे भारत’ ट्रेन

पुढील तीन वर्षांत 400 ‘वंदे भारत’ ट्रेन सुरू केल्या जातील. त्याद्वारेही ‘एक उत्पादन, एक रेल्वेस्टेशन’ ही योजना लोकप्रिय करण्याचा प्रयत्न राहणार आहे. येत्या दोन-तीन वर्षांत ‘वंदे भारत’ कोल्हापुरातून धावेल, अशीही शक्यता आहे.

देशात चार ठिकाणी ‘मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क’ उभारले जाणार आहेत. याकरिता शंभर ठिकाणी ‘पीएम गतिशील कार्गो स्टेशन’ उभारले जाणार आहेत.

कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातील कोल्हापूरचे योगदान आणि भौगोलिक स्थान पाहता, कोल्हापूर परिसरातही ‘कार्गो स्टेशन’साठी पूरक असेच वातावरण आहे. यामुळे या योजनेंतर्गत कोल्हापूर परिसरातही कार्गो स्टेशन उभारले जाण्याची शक्यता आहे.

Back to top button