

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : कोरोनाच्या तिसर्या लाटेदरम्यान सादर झालेल्या या अर्थसंकल्पातून (Budget 2022) सरकारने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनविण्यावर भर दिला आहे. काही उत्पादनांवरील आयात शुल्क वाढविले आहे, तर काही उत्पादनांवरील आयात शुल्कात कपात केली आहे आणि हेच ही उत्पादने/वस्तू स्वस्त वा महाग होण्याचे निमित्त ठरणार आहे.
मोबाईल फोन चार्जर, मोबाईल फोन कॅमेरा लेन्स, ट्रान्स्फॉर्मरच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आयात शुल्कात सवलत देण्याची घोषणा केली आहे. यामुळे मोबाईल फोनसह मोबाईलचे सुटे भाग स्वस्त होतील, अशी अपेक्षा आहे.
दागिने उद्योगाला प्रोत्साहनासाठी सरकारने कट आणि पॉलिश डायमंडसह रत्न-माणकांवरील आयात शुल्क घटवून 5 टक्के केले आहे. कच्च्या हिर्यांवर तर कुठलेही आयात शुल्क नसेल. इम्पोर्टेड छत्रीवर सरकारने आयात शुल्क वाढविल्याने छत्र्या महाग होणार आहेत.
बहुतांश वस्तूंवर परिणाम नाही; कारण… (Budget 2022)
खरे तर आता 90 टक्के वस्तूंचे दर कमी होतील की जास्त, हे 'जीएसटी'च ठरवते. परदेशातून आयात होणार्या वस्तूंवर आयात शुल्काचा परिणाम होतो आणि हे अर्थसंकल्पातच ठरते. परिणामी, पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी, आयात दारू, आयात चामडे, सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, रसायने, वाहनांसारख्या वस्तूंच्या किमतीवरच अर्थसंकल्पातील तरतुदींचा परिणाम होतो. यावरच सरकारकडून आयात शुल्क घटविले किंवा वाढविले जाते. काहींवर एक्साईजही आकारली जाते.
आयात शुल्काचे मापदंड काय?
आयात शुल्क ठरविताना वस्तूची किंमत, ती कोणत्या देशांतून येते आहे, याचाही परिणाम होतो. आयात शुल्काची दोन उद्दिष्टे असतात; एक सरकारसाठी महसूल संकलन आणि दुसरे म्हणजे स्थानिक पातळीवर उत्पादित होणार्या वस्तूंना बाजाराचा अधिक लाभ देणे.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडर स्वस्त (Budget 2022)
अर्थसंकल्प सादर होण्याआधीच एलपीजी सिलिंडर कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडर दरामध्ये कपात जाहीर केली होती. कंपन्यांनी 1 फेब्रुवारी 2022 पासून व्यावसायिक वापराच्या 19 किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडर दरात 91.50 रुपयांनी कपात केली आहे.