वैराग नगरपंचायत निवडणुकीत १८ जणांचे डिपॉझिट जप्त | पुढारी

वैराग नगरपंचायत निवडणुकीत १८ जणांचे डिपॉझिट जप्त

वैराग : पुढारी वृत्तसेवा

नव्याने स्थापन झालेल्या वैराग नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी १३ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळविले. या निवडणुकीत १८ जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. विशेष म्‍हणजे, एका अपक्ष उमेदवाराला मताचे खातेही उघडता आलं नाही.  पक्ष व मतांची टक्‍केवारी कंसात पुढील प्रमाणे :  राष्ट्रवादीला (४५) ,  भाजपला ( ३२), शिवसेना ( १६ ), अपक्ष ( २) टक्के,  या निवडणुकीत ८४ मते ही नोटाला मिळाली आहेत.

सतरा जागा असलेल्या वैराग नगरपंचायतीच्या निवडणुकीत तीन प्रमुख पक्षांसह अपक्षांनी आपले नशीब आजमावले. यामध्ये ६२ जण रिंगणात उतरले होते. वैरागच्या जनतेने अपक्षांना स्पष्ट नाकारलेले दिसून येत असून, बारा अपक्षांपैकी दहाजणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. पक्षांमध्ये सर्वाधिक अनामत रक्कम जप्त होण्याचे प्रमाण शिवसेनेचे असून एका शिवसेना पुरस्कृत उमेदवारासह सहा शिवसेना उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

माजी जि.प. सदस्या तेजस्विनी मरोड या काँग्रेसकडून उभारल्या होत्या. त्यांचेदेखील डिपॉझिट जप्त झाले आहे. वैरागमध्ये सर्व जागांवर बाजी मारणार्‍या राष्ट्रवादी पक्षाला प्रभाग क्रमांक आठमध्ये मात्र नामुष्कीला सामोरे जावे लागले. तिथून त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. प्रभाग क्रमांक बारामधील उमेदवार चैतन्य सुरेश लोकरे या उमेदवाराने स्वतःला देखील मतदान करुन घेतलेली दिसून येत नाही. कारण त्यांना शून्य मते मिळाली आहेत. वैराग नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले असले तरी त्यांच्या कोणत्याही उमेदवाराचे डिपॉझिट मात्र जप्त झालेले नाही.

वैराग नगरपंचायत निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मतदान झाले. या दोन टप्प्यांमध्ये ७८ टक्के मतदारांनी म्हणजेच चौदा हजार ७६२ मतदारांपैकी अकरा हजार ५५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक ५ हजार २४५ मते मिळाली. त्याखालोखाल भारतीय जनता पक्षाला तीन हजार ६६२ मते मिळाली. शिवसेना आणि काँग्रेस आघाडीला १९११ मते मिळाली असून ३६१ मते अपक्षांनी घेतली आहेत. हत्ती चिन्ह घेऊन उभ्या असलेल्या उमेदवाराला फक्त ६ मते, तर ८४ जणांनी नोटाला पसंती दिली आहे. प्रभाग क्रमांक सहामधील एकाही उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झालेले नाही.

डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांची नावे

अपक्ष – अतुल प्रकाश मलमे, उज्ज्वला संजय गाढवे, भाग्यश्री अरुण क्षीरसागर, आनंद दादाराव गवळी, रवींद्र सुभाष पवार, अतीश विलास कांबळे, कुलदीपसिंह विजयसिंह बायस, चैतन्य सुरेश लोकरे, प्रभाकर साधू क्षीरसागर. शिवसेना – विकास सूर्यकांत मगर (पुरस्कृत), मुमताज आयुब शेख, संध्याराणी राहुल आहिरे , तेजस्विनी मरोड (काँग्रेस), शोभा श्रीराम पांढरमिसे, शुभांगी नंदकुमार पांढरमिसे, रवींद्र सुभाष पवार, राष्ट्रवादी – कविता जयंत खेंदाड, बसपा – ताजुद्दीन शौकत शेख.

हेही वाचलंत का ?

 

Back to top button