सोलापूर : द्राक्ष निर्यात करण्यास शेतकर्‍यांच्या मनात भीतीचे सावट; जागेवर द्राक्ष विक्री करण्यावर शेतकर्‍यांचा भर | पुढारी

सोलापूर : द्राक्ष निर्यात करण्यास शेतकर्‍यांच्या मनात भीतीचे सावट; जागेवर द्राक्ष विक्री करण्यावर शेतकर्‍यांचा भर

सांगोला; पुढारी वृत्तसेवा :

सांगोला तालुक्याच्या अनेक भागांत द्राक्ष चांगलीच बहरली आहेत. द्राक्ष हंगाम आता हळूहळू गती घेत आहे. द्राक्षमाल खरेदीसाठी अनेक राज्यांतून द्राक्ष एजंट दाखल झाले आहेत. यावर्षी शेतकर्‍यांनी निर्यातक्षम द्राक्ष तयार केली असून मालाला चांगला भाव मिळत आहे; पण ओमायक्रॉनच्या सावटाखाली द्राक्ष हंगाम अडकला असून शेतकर्‍यांच्या मनात भीतीचे सावट आहे.

डाळिंबावर प्रादुर्भाव वाढल्याने व डाळिंबाबरोबर इतर पीक म्हणून अनेक शेतकर्‍यांनी आज द्राक्ष हा पर्याय निवडला आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव या भागासह सांगोला तालुक्यात द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते.

गेल्या वर्षी द्राक्ष हंगाम सुरुवातीला चांगला चालला, पण शेवटच्या टप्प्यात दर एकदम खाली आल्याने द्राक्ष बागायतदार शेतकरी अडचणीत सापडला होता. तोच अनुभव गाठीशी ठेवून यावर्षी द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी द्राक्ष छाटणी टप्प्याटप्प्याने घेतली आहे.

यंदा अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असले तरी, परिपक्वतेच्या अवस्थेत पाऊस झाल्याने मण्यांना तडे गेले आहेत. अजूनही हवामान चांगले नसून मोठ्या प्रमाणात धुके व दव पडत असल्याने मण्यांना तडा जाण्याची शक्यता आहे. सध्या द्राक्ष हंगाम गती घेत असून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून जोरदारपणे सुरू होईल, असा अंदाज जाणकार शेतकरी वर्गातून वर्तविला जात आहे.

यावर्षी डिसेंबरला चालू झालेला द्राक्ष हंगाम मार्च अखेरपर्यंत चालणार असला तरी अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येणार आहे. यंदा द्राक्षांना चांगला दर मिळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. डाळिंबावर रोग प्रादुर्भाव आल्याने शेतकरी काही प्रमाणात नाराज असला तरी, अनेक भागात शेतकर्‍यांनी पुन्हा डाळिंब लागवडीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.

काही ठिकाणी डाळिंब लागवड होताना दिसत आहे. द्राक्ष बरोबर आज ही डाळिंब फळबाग उत्कृष्ट पद्धतीने टिकवून ठेवण्यात अनेक शेतकरी यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे द्राक्षे या फळ पिकाबरोबर डाळिंबाला ही तितकेच महत्त्व मिळत आहे. द्राक्ष बरोबर डाळिंबाची ही चांगलीच खरेदी-विक्री होत असल्याने आर्थिक उलाढाल होत असल्याचे समजत आहे. कोरोनाच्या परस्थितीत वाढ झाल्यास द्राक्ष बागायतदारांना अडचणीचे ठरणार आहे.

ऐकावं ते नवलच! मुख्याध्यापकानं चावला शिक्षकाचा अंगठा, जेवण दिलं नाही म्हणून केलं कृत्य, प्रकरण गेलं पोलिसात

SOLAPUR GRAPE FARMING: जागेवर द्राक्ष विक्रीवर भर

परप्रांतीय एजंट शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन द्राक्ष बागांची पाहणी करून दर ठरवत आहेत. शेतकर्‍यांकडूनदेखील बागेतून द्राक्ष विक्री करण्यासाठी अधिक भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे.

 

हे ही वाचा :

 

पहा व्हिडीओ : कापसाच्या दराने गाठला उच्चांक; प्रति क्विंटल १०,३१५ रुपयांवर भाव

Back to top button