डिचोली, पुढारी वृत्तसेवा; मणेरी येथे तिलारीचा कालवा पुन्हा फुटला. त्यामुळे हजारो लिटर पाणी शेतात शिरल्याने उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी (दि. 13 )पहाटे घडली.
मणेरी धनगरवाडी येथे गेल्या वर्षी फुटलेल्या मायनर कालव्याच्या ठिकाणी गळती सुरू आहे, याची जाणीव येथील शेतकरी विश्राम कुबल यांनी संबंधित अधिकार्यांना दिली होती. मणेरी धनगरवाडी येथे डाव्या कालव्याला भगदाड पडले तेव्हा या ठिकाणी दुरुस्ती करावी, अशा सूचना केल्या होत्या. पण या अधिकार्यांनी दुर्लक्ष केले होते.
मणेरी धनगरवाडी परिसर ते मणेरी गावात डाव्या मुख्य कालव्याला जोडून हा मायनर कालवा आहे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. पण या नंतर या मायनर कालव्याच्या ठिकाणी डागडुजी, साफसफाई करणे याकडे जलसंपदा कालवा विभागाने जाणूनबुजून दुर्लक्ष केले. संबंधीत शेतकरी बांधव यांच्याकडून घेतलेल्या पाण्याची कर आकारणी केली जाते. मग डागडुजी, साफसफाई करणे ही जबाबदारी संबंधित कालवा विभाग अधिकारी शाखा अभियंता यांची आहे, पण असे होताना दिसत नाही.
दोडामार्ग तालुक्यातील अनेक मायनर कालव्यांवर झाडीझुडपे वाढलेली आहेत. अनेक ठिकाणी गळती लागली आहे.काही ठिकाणी कालव्याचे भाग कोसळले आहेत. पण याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप शेतकर्यांनी केला आहे.
दरम्यान, सरपंच विशांत तळवडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कालवा फुटल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या कर्मचार्यांना दिली गेली. ते घटनास्थळी सकाळी नऊ वाजता दाखल झाले नंतर मायनर कालवा गेट बंद करण्यात आले.
संबंधित अधिकार्यांनी वेळीच लक्ष दिले असते दूरुस्ती केली असती तर ही घटना घडली नसती, असे सरपंच तळवडेकर यांनी सांगितले. संबंधित अधिकारी अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. त्यामुळे या घटना घडत आहेत, असा आरोप सरपंच तळवडेकर यांनी करून शेतकरी बांधवांनी उन्हाळी शेती कशी करावी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचलंत का?