अक्षय खताळ : इच्छा नसतानाही काही लोकांनी भाजपात आणले ; राजन पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा - पुढारी

अक्षय खताळ : इच्छा नसतानाही काही लोकांनी भाजपात आणले ; राजन पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :

दोन दिवसांपूर्वी भाजपच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय खताळ यांनी राजीनामा देत माजी आ. राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला. आपली इच्छा नसतानाही भाजपमध्ये काही लोकांनी नेले. यामुळे या पुढे राजकारणात माजी आ. राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पत्रकार परिषदेत अक्षय खताळ बोलत होते. माजी आ. राजन पाटील, आ. यशवंत माने, बळीराम साठे, महेश कोठे, दिलीप कोल्हे, बाळराजे पाटील, अजिक्यराणा पाटील, प्रकाश चवरे उपस्थित होते. अक्षय खताळ यांनी इच्छा नसतानाही लोकांनी हट्ट करुन मला भाजपात नेले असल्याचाही खुलासा केला. आ. गोपीचंद पडळकर यांना भेटण्यासाठी जायचं आहे, असे सांगून तालुक्यातील काही मंडळींनी आपल्याला नेले.यावेळी आ. गोपीचंद पडळकर यांनी घरी आल्याबद्दल स्वागत आणि सत्कार केला. ते फोटो काही लोकांनी जाणिवपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल केले आणि माझा भाजपात प्रवेश झाल्याचे जाहीर केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी तातडीने ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्षपद दिले. यामध्ये माझी कोणतीच राजकीय इच्छा नव्हती. काही दिवसांपूर्वी माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यामुळे आता राजकीय भूमिका स्पष्ट करण्याच्या मी मानसिकतेत नव्हतो, त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी थोडा संयम ठेवण्याचे सांगितले होते. मात्र राजकीय भूमिका स्पष्ट नसली तरी यापुढे पाटील यांच्या नेतृत्वाखालीच काम करु, असे अक्षय खताळ यांनी सांगितले.

बळीराम साठे म्हणाले, अक्षय खताळ यांचे वडील तानाजी खताळ यांना जिल्हा परिषद गटात तसेच मोहोळ तालुक्यात चांगला जनाधार आहे. युवकांचे संघटन करण्याची चांगली धमक आहे. मात्र सध्या पक्षाची कोणतीही जबाबदारी अक्षय खताळ यांच्यावर दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. आ. यशवंत माने यांनी तालुक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी सक्षमपणे माजी आ. राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे.त्यामुळे अक्षय खताळ यांचे पक्षात स्वागत आहे. जर त्यांनी पक्षाचे काम सुरु केले तर भविष्यात त्यांच्याकडे पक्ष चांगली जबाबदारी सोपवेल, असा विश्‍वास व्यक्त केला, तर यावेळी बोलताना माजी आ. राजन पाटील यांनी कै. तानाजी खताळ हे माझे चांगले मित्र होते. मात्र मध्यंतरीच्या काळात ते काही कारणास्तव माझ्यापासून दुरावले होते. मात्र निधन होण्यापूर्वीच त्यांनी अनेकवेळा मला भेटून आपण एकत्र येऊ, अशी भूमिका घेतली होती. मात्र ते होण्याअधीच त्यांचे निधन झाले.त्यामुळे अक्षय खताळ यांना वडिलांची कमी भासू देणार नाही, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. त्यांना नेहमीच आपली मदत राहील, असे सांगितले.

माझ्यावर कोणाचाही दबाव नाही : अक्षय खताळ

भाजपमध्ये मला इच्छा नसताना काही लोकांनी नेले तसेच मागणी केली नसताना ओबीसीचे जिल्हाध्यक्षपद दिले. मात्र कौटुंबिक अडचणीमुळे आपण सध्या राजकीय भूमिका घेऊ शकत नाही. त्यामुळे भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र भविष्यातील राजकीय वाटचाल मोहोळचे माजी आ. राजन पाटील यांच्या नेतृत्वाखालीच करु. मात्र या सर्व घटना घडत असताना आपल्याला कोणाचाही दबाव नव्हता, असे स्पष्टीकरण अक्षय खताळ यांनी दिले आहे.

हेही वाचा :

Back to top button