सातारा : लसीकरण झालेल्यांपैकी 9 टक्केच बाधित

सातारा : लसीकरण झालेल्यांपैकी 9 टक्केच बाधित

सातारा : पुढारी वृत्तसेवा

कोरोना प्रतिबंधात्मक लस अत्यंत बहुगुणी ठरत असल्याचे समोर आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरणच प्रभावी ठरू लागल्याचे आता सिद्ध झाले आहे. लस घेतल्यानंतर संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या एकूण बाधितांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतलेल्या केवळ नऊ टक्के नागरिकांनाच कोरोनाचा संसर्ग झाला आहे. लसीकरणामुळे रुग्णांच्या जीवावरचा धोका टळत आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात-लवकर लसीकरण करणे आवश्यक आहे.

गेली दोन वर्षे कोरोनाशी सामना केला जात आहे. सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पहिल्या व दुसर्‍या लाटेत बेडची उपलब्धता, ऑक्सिजनची कमतरता, व्हेंटिलेटरची अपुरी सुविधा यांसारख्या समस्या भेडसावत होत्या. मात्र, काही महिन्यांनंतर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर बाधित रुग्णांची संख्या घटण्यास सुरुवात झाली. कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांची संख्या अत्यल्प असल्याचे दिसून येते. दरम्यान, लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला आरोग्य विभाग व फ्रंटलाईन वर्कर्स त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व इतर आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरण सुरुवात झाली.

त्यानंतर 18 वर्षांपुढील व्यक्तींसाठी लसीकरण मोहीम सुरु झाली. या प्रकारे टप्याटप्याने लसीकरण सुरू झाले. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात 15 ते 17 वर्षे या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण 70 टक्क्यांहून अधिक झाले आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात 40 लाख 41 हजार 893 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामधील पहिला डोस 22 लाख 97 हजार नागरिकांनी घेतला असून सात लाख 12 हजार 932 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 15 ते 17 वयोगटाची एकूण लोकसंख्या एक लाख 51 हजार 149 आहे. यामधील पहिला डोस 99 हजार 589 मुलांनी घेतला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणासाठी पुढे येणे गरजेचे आहे.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण गरजेचे

गेल्या महिनाभरात कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 22 हजार 639 इतकी आहे. यापैकी केवळ एक हजार 825 नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news