पाटण : गणेशचंद्र पिसाळ
कोयना धरणात एक जूनपासूनच्या तांत्रिक जल वर्षापैकी नऊ महिन्यांत धरणात तब्बल 158.63 टीएमसी पाण्याची आवक झाली. या काळात पश्चिमेकडे विजनिर्मितीसाठी 43.27 पूर्वेकडे सिंचनासाठी 7.18, पूरकाळात 7.86 व विनावापर 46.45 अशा तब्बल 96.90 टीएमसी पाण्यानंतरही सध्या धरणात तब्बल 76.74 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षी पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी ज्यादा पाणीवापर होऊनही आगामी तीन महिन्यांतील ऐन उन्हाळ्यासाठी येथे समाधानकारक पाणीसाठा शिल्लक असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे .
105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले कोयना धरणातील एकूण पाणीसाठ्यापैकी 67.50 टीएमसी पाणी पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी देण्यात येते. आतापर्यंत नऊ महिन्यात यापैकी 43.27 टीएमसी पाणीवापर झाल्याने उर्वरित तीन महिन्यांसाठी 24.23 टीएमसी आरक्षित पाणीकोटा शिल्लक आहे. सिंचनासाठी वर्षभरात सरासरी 35 टीएमसी पाण्याची गरज असते. आत्तापर्यंत सिंचनासाठी केवळ 7.18 टीएमसी इतकाच पाणीवापर झाला असून आगामी काळात सिंचनाच्या पाण्याचाही मार्ग सुखकर आहे. आगामी काळातील वीजनिर्मिती, सिंचन व मृतसाठा लक्षात घेता धरणातील सध्याचा उपलब्ध एकूण 76.74 टीएमसी पाणीसाठा समाधानकारक आहे.
यावर्षी पावसाने आजवरचे अनेक विक्रम मोडीत काढले . फेब्रुवारीअखेर धरणात गतवर्षीच्या तुलनेत सरासरी 700 मिलिमीटर पाऊस ज्यादा झाला आहे. जुलैमध्ये कमी काळात अधिक पाऊस व नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक प्रकारच्या नैसर्गिक व कृत्रिम आव्हानांना सामोरे जावे लागले.ऑगस्टमध्ये अत्यल्प पाऊस झाला परंतु ती घट सप्टेंबरनंतर भरून निघाली. यातूनच तुलनात्मक ज्यादा पाऊस व धरणात अपेक्षित पाणीसाठा झाला आहे . एकूणच धरणाची तांत्रिक व नैसर्गिक परिस्थिती समाधानकारक असल्याने उर्वरित तीन महिने व आगामी जल वर्षाच्या शुभारंभाचे भवितव्य सुरक्षित आहे.