महाबळेश्वर (सातारा) : प्रेषित गांधी
मिनी कश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये चार दिवस सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली होती. मात्र, नेहमीप्रमाणे पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. हंगाम पूर्व नियोजनाचा अभाव, पोलिस प्रशासनाची गांधारीची भूमिका यामुळे वाहतूक कोंडीचे हे ग्रहण सुटण्याचे नाव घेत नाही. मे महिन्याच्या उन्हाळी हंगामात अशी परिस्थिती येऊ नये, यासाठी नियोजन करणे गरजेचे झाले आहे.
मागील आठवड्यात सलग चार दिवस सुट्ट्या आल्याने मोठया प्रमाणात पर्यटकांनी महाबळेश्वरमध्ये गर्दी केली होती. मात्र, वाहतूकीचे नियोजन नसल्याने यंदाही पर्यटकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. ठिकठिकाणी ट्रॅफिक जाममध्ये अडकल्याने पर्यटक अक्षरश: वैतागले होते. मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. दर हंगामात होणारी वाहतूक कोंडी पर्यटक व पोलिसांची डोकेदुखी आहे.पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोणतीच अॅक्शन होत नाही. त्यामुळे महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतही वाहनांची रेलचेल असते. नो एन्ट्रीमध्ये वाहनधारक ये-जा करत असताना पोलिस मात्र बघ्याच्या भूमिकेत असतात.
वेण्णालेक परिसरात तब्बल चार -पाच कि.मी. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याने तासन्तास पर्यटकांना या वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. वेण्णालेक येथील पर्यायी रस्त्याच्या कामास मुहूर्त मिळाला असता तर या भागातील वाहतूक कोंडी कायमची सुटण्यास मदत झाली असती. मात्र, अधिकारी वर्गाचे कागदी घोडे नाचवण्याचे प्रकार व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडीवर पर्याय निघालेला नाही.
महाबळेश्वरमध्ये आता बारमाही पर्यटन असल्याने मुंबई, पुण्यासह देश विदेशातून पर्यटक येत असताना. मुंबई व पुण्यातील पर्यटक हे स्वत:च्या वाहनांनी येतात. परंतु, अपुरी वाहनतळे, पार्किंगसाठी कमी असणारी जागा व गचाळ नियोजन वाहनतळाऐवजी दुसर्याच ठिकाणी वाहने लागलेली दिसतात. अनधिकृतपणे बर्याच गाड्या अनेक महिन्यांपासून पडल्या आहेत. याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाहीत. वाहनतळाच्या बाजूला हॉटेल्स ग्राहकांच्या गाड्याच लागतात. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही.
शहरातील सुभाष चौक, शिवाजी चौक, आराम खिंड, बस स्थानक परिसर, माखारीया गार्डन या भागात वाहतुकीची कोंडी होत असते. या भागात योग्य नियोजन केल्यास वाहतूक कोंडी कमी करता येऊ शकते. केवळ दिखावा न करता पोलिस प्रशासनाने हंगामी काळात महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून उपाय करण्याची गरज आहे.शहरातील पर्यटन मोसमासाठी पोलिस प्रशासनाने विशेष वाहतूक शाखेचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी विशेष वाहन, अधिकचे मनुष्यबळ मोसमासाठी वर्ग करण्यात आले होते. त्याचे नियोजनच होत नसल्याचे दिसून येत आहे.