नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
देशातील कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २,०६७ नवे रुग्ण (new Covid cases) आढळून आले आहेत. तर ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या वाढून १२,३४० वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांतील रुग्णसंख्या ही सोमवारच्या तुलनेत ६५ टक्क्यांनी अधिक आहे.
देशातील कोरोना मुक्तीदर ९८.७६ टक्के एवढा आहे. गेल्या २४ तासांत १,५४७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ०.४९ टक्के तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.३८ टक्के आहे.
याआधीच्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य घट नोंदवण्यात आली होती. सोमवारी दिवसभरात १ हजार २४७ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, एक रुग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान ९२८ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. मंगळवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७६ टक्के तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.३१ टक्के नोंदण्यात आला होता.
देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८६ कोटी ९० लाख डोस देण्यात आले आहेत. यातील २.४७ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील मुलांना देण्यात आले आहे.तर, खबरदारी म्हणून २ कोटी ५५ लाख ५७ हजार ५७६ बूस्टर डोस देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९२ कोटी २७ लाख २३ हजार ६२५ डोस पैकी २० कोटी ५२ लाख ७ हजार २६१ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.देशात आतापर्यंत ८३ कोटी २५ लाख ६ हजार ७५५ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख १ हजार ९०९ तपासण्या सोमवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.
दिल्ली एनसीआर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा मास्कसक्ती लागू करण्यात आली आहे. हा मुंबईला इशारा समजला जातो.
दिल्ली एनसीआर क्षेत्रात दोन दिवसांपासून कोरोनाचे ५०० हून अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. चिंतेची बाब म्हणजे, ११ ते १८ एप्रिल या काळात कोरोनाबाधेचे प्रमाण तिप्पट झाले आहे. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगर, गाझियाबाद, हापूर, मीरत, बुलंदशहर आणि बागपत या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असून, सक्रिय रुग्णांची संख्या ६९५ वर गेली आहे.
एकट्या गौतम बुद्धनगर जिल्ह्यातच मंगळवारी कोरोनाच्या १०७ नव्या रुग्णांचे निदान झाले; त्यापैकी ३३ शालेय विद्यार्थी आहेत. त्याचप्रमाणे हरियाणातील गुरुग्राम, फरीदाबाद, सोनिपत आणि झज्जर या जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील सहा आणि हरियाणातील चार जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
दिल्ली आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांतून मुंबईत दररोज सुमारे १९ ते २० मेल-एक्स्प्रेस येतात. मध्य रेल्वेवर उत्तर प्रदेश येथून सर्वाधिक गाड्या येतात. दररोज सुमारे १० ते १२ एक्स्प्रेस उत्तर प्रदेश येथून सीएसएमटी, एलटीटी येथे येतात. एका गाडीतून अंदाजे एक हजार ५०० प्रवासी येतात.
म्हणजेच दिवसाला १० गाड्या जरी मुंबईत येतात असे म्हटले तरी सुमारे १५ हजार प्रवासी मुंबईत दाखल होतात. तेवढेच प्रवासी मुंबईतून या गाड्यांमधून जातात. यामध्ये पुष्पक एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, उद्योग नगरी एक्स्प्रेस, वाराणसी या गाड्यांचा समावेश आहे. सीएसएमटीहून दिल्लीकरिता एक राजधानी एक्स्प्रेस चालविण्यात येते. पश्चिम रेल्वेवरून खासकरून दिल्लीकरिता एक्स्प्रेस सुटतात. बांद्रा टर्मिनस, मुंबई सेंट्रल येथून दिल्लीकरिता दिवसाला ९ ते १० गाड्या चालविण्यात येतात.
यामध्ये संपर्क क्रांती एक्स्प्रेस, पश्चिम एक्स्प्रेस, गरीब रथ, दुरान्तो, राजधानी एक्स्प्रेस, अगस्त क्रांती एक्स्प्रेसचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेवर एका गाडीतून अंदाजे दीड हजार प्रवासी येतात. सध्या रेल्वे स्थानकावर उतरणार्या प्रवाशांची चाचणी केली जात नाही. साधे तापमानही पाहिले जात नाही. अशा गाफील परिस्थितीत दिल्ली, उत्तर प्रदेशचा कोरोना मुंबईत दाखल होण्याची भीती आता जाणकार व्यक्त करत आहेत.
मुंबईत मंगळवार १९ एप्रिलला २४ तासांत ८५ रुग्णांची नोंद झाली, तर एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. दिवसभरात ५२ रुग्ण बरे झाले. सक्रिय रुग्णांची संख्या ३९० इतकी आहे. गेल्या २४ तासांत ९ हजार ३७२ चाचण्या करण्यात आल्या.