महाबळेश्वर, पाचगणीच्या पर्यटन मास्टर प्लॅनला मंजूरी द्या : श्रीनिवास पाटील

महाबळेश्वर, पाचगणीच्या पर्यटन मास्टर प्लॅनला मंजूरी द्या : श्रीनिवास पाटील
Published on
Updated on

कराड : प्रतिनिधी : जागतिक दर्जाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर व पाचगणीचा विकास व संवर्धन होणे आवश्यक आहे. पर्यटकांचे आकर्षण वाढावे, पर्यटनातून त्या भागाचा विकास व्हावा व त्यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळून त्यांच्या उपजीविकेचे साधन निर्माण व्हावे, यासाठी महाबळेश्वर आणि पाचगणीच्या पर्यटन मास्टर प्लॅनला मंजूरी द्यावी,  अशी मागणी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली.

संसदेत लोकहिताचे तातडीच्या मुद्दावरील चर्चेवेळी खा. श्रीनिवास पाटील म्हणाले की, माझ्या लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यात पाचगणी आणि महाबळेश्वर ही जागतिक दर्जाची थंड हवेची ठिकाणे आहेत. ही ठिकाणे मनमोहक, नैसर्गिकदृष्टया समृद्ध व आरोग्यदायी असल्याने प्रसिद्धास येत आहेत. पूर्वीच्या काळी येथे लोकवस्ती अतिशय थोडी होती. आता लोकसंख्या वाढून ती तिप्पट झाली आहे. पाचगणी येथे शाळा, इंग्लिश मेडियम स्कूल असल्याने भारताच्या सगळ्या क्षेत्रातून विद्यार्थी येतात. मात्र, गेली कित्येक वर्ष या भागाचा विकास करण्यासाठी पाचगणी आणि महाबळेश्वर नगरपालिकेने जो मास्टर ट्यूरिझम प्लॅन भारत सरकारकडे पाठवला आहे त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही.

या भागात परिस्थितीनुसार सर्व योजना राबवाव्या लागतात. परिणामी, येणाऱ्या पर्यटकांना, प्रवाशांना अपेक्षित अशी सोयीसुविधा मिळत नाही. त्यांची राहण्याची सोय होत नाही.  ब्रिटिश काळामध्ये घोड्याच्या पाठीवरून वेगवेगळे पॉंईट बघण्याकरता राईडस् होत असतात. ते पॉंईट ढासळले असून पाय-या निखळल्या आहेत. त्यामुळे घोड्यावरून पडण्याची संख्या वाढून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.  (पर्यटन मास्टर प्लॅनला मंजूरी )

याठिकाणच्या संवर्धनासाठी, पर्यटन विकासासाठी तसेच सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असे पर्यटनस्थळ निर्माण व्हावे म्हणून जो मास्टर प्लॅन दिलेला आहे तो लवकरात- लवकर मंजूर करण्यात यावा. त्यातून त्या भागातील स्थानिक सर्वसामान्य माणसांना रोजगार मिळेल, फळे-फुले विक्री करता येईल. प्रसिध्द अशी घोड्यांची सवारी करता येईल. तसेच हा मास्टर प्लॅन मंजूर करण्यासाठी जास्ती-जास्त प्रयत्न व्हावेत. त्यास वन व पर्यावरण मंत्र्यांनी परवानगी द्यावी, अशी मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी केली.

श्रीनिवास पाटलांचा मराठीबाणा

खा. श्रीनिवास पाटील यांचे मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे. ग्रामीण मराठी भाषा बोलतानाची त्यांची वेगळी अशी शैली आहे. लोकसभेत ते सातारा मतदारसंघातील प्रश्न विविध भाषातून मांडताना दिसून येतात. महाबळेश्वर व पाचगणीच्या विकासासाठी बोलताना त्यांनी मराठी भाषेची आवर्जुन निवड केली. संसदेत त्यांनी मराठीतून केलेल्या भाषणाने सभागृहाचे लक्ष वेधले.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news