Congress G-23 : काँग्रेसच्या G-23 गटातील भुपिंदर सिंग हुड्डा अचानक राहुल गांधींच्या भेटीला | पुढारी

Congress G-23 : काँग्रेसच्या G-23 गटातील भुपिंदर सिंग हुड्डा अचानक राहुल गांधींच्या भेटीला

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : काँग्रेसमधील G-23 नाराज नेत्यांनी काल गुलाम नबी आझाद यांच्या घरी बैठक घेतली. यावेळी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांचीही उपस्थिती होती. दरम्यान त्यांनी आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. काँग्रेस पक्षाच्या हरियाणा राज्य प्रमुख कुमारी सेलजा यांच्या कामगिरीवर भुपिंदर सिंग हुड्डा नाराज आहेत. यासाठी ते राहुल गांधींना भेटण्यासाठी गेल्याचे बोलले जात आहेत. (Congress G-23)

Congress G-23 च्या काही सदस्यांव्यतिरिक्त काही “नवीन चेहऱ्यांसह” 18 काँग्रेस नेत्यांनी काल रात्री एक बैठक घेतली आणि सामूहिक, सर्वसमावेशक नेतृत्वाच्या मुद्दांवर त्यांनी भर दिला.

काँग्रेसमध्ये जनतेत लोकप्रिय मानले जाणारे भूपिंदर सिंग हुड्डा हे नव्या चेहऱ्यांपैकी एक आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वी पक्षाच्या २३ असंतुष्ट नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून नेतृत्व बदलासह पक्षात अनेक मोठे बदल करण्याची मागणी केली होती.

काँग्रेस कार्यकारिणीने (CWC) नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाचा आढावा घेतला. याचबरोबर कपिल सिबल यांनी थेट गांधी कुटुंबियांवर थेट आरोप केले. दरम्यान, काँग्रेसमधील नाराज गटातील नेत्यांची काल रात्री बैठक झाली.

विधानसभा निवडणुकांच्या मदतीने २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची स्थिती मजबूत करण्याची आशा असलेल्या काॅंग्रेसची कामगिरी पाच राज्यांमध्ये अत्यंत निराशाजनक राहिली. निवडणूक तयारीसाठी CWC बैठकीत संसदेच्या सत्रानंतर नवीन समितीच्या स्थापनेवर चर्चा झाली, परंतु कोणतेही कठोर बदल करण्याचे आश्वासन दिले गेले नाही. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच निवडणूक राज्यांमधील पक्षाच्या राज्य प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Back to top button