महाबळेश्वर पर्यटकांनी फुलले; देश-विदेशातील पर्यटक गुलाबी थंडीत दंग

महाबळेश्वर पर्यटकांनी फुलले; देश-विदेशातील पर्यटक गुलाबी थंडीत दंग

Published on

देशविदेशातील पर्यटकांच्या पसंतीचे थंड हवेचे निसर्गरम्य पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर हे दिवाळी हंगामामुळे बहरले आहे. हिरवाईने नटलेले निसर्ग सौंदर्य पाहण्यात आणि गुलाबी थंडीची मजा लुटताना पर्यटक दिसत आहेत. दरम्‍यान, पर्यायी रस्त्या अभावी वेण्णालेक येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने या वाहतूक कोंडीत पर्यटकांसह स्थानिक अडकून पडल्‍याचे चित्र दिसून येत आहे.

महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरात दिवाळी हंगामास प्रारंभ

महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वरकडे देशविदेशातील पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. विशेषतः दिवाळी व उन्हाळी हंगामात पर्यटकांची संख्या लक्षणीय असते, सध्या दिवाळी सुट्टी असल्याने महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची रेलचेल असून येथील प्रसिद्ध केट्स पॉईंट, महाबळेश्वरची शान असलेला ऑर्थरसीट पॉईंट, शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे किल्ले प्रतापगड, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेला लॉडवीक पॉइंट शहरानजीकचा सूर्योदयासाठीचा प्रसिद्ध विल्सन पॉइंट, सूर्यास्तासाठी प्रसिद्ध मुंबई पॉइंटसह पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण लिंगमळा धबधबा ही पर्यटकांच्या पसंतीची ठिकाण असलेली ही स्थळे गर्दीने गजबजली आहेत

सोशल डिस्‍टन्सिंग पाळून नौकाविहारासाठी रांगा

पर्यटक येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटताना पाहावयास मिळत आहेत, तर मुख्य आकर्षणाचे ठिकाण असलेल्या नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेकला जणू "चौपाटी" चे स्वरूप प्राप्त झाले आहे. पालिकेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सोशल डिस्‍टन्सिंग पाळून पर्यटकांना नौकाविहारासाठी रांगा लागण्याचे चित्र आहे. 'एन्ट्री व एक्झिट' ची वेगळी व्यवस्था देखील करण्यात आली आहे. पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेता नौकाविहारासाठी जाणाऱ्या पर्यटकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने लाईफ जॅकेटची व्यवस्था करण्यासोबतच वापरण्यात आलेले जॅकेट्स हे निर्जंतुक करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

हौशी पर्यटक वेण्णालेकवर घोडेसवारीचा आनंद लुटताना दिसत आहेत. बालचमूंसाठी विविध गेम्सची धूम आहे. खवय्यांसाठी स्ट्रॉबेरी पासून बनविलेली विविध खाद्यपदार्थ, गरमागरम मका कणीस, फ्रँकी, पॅटिस, पाणीपुरी, भेळ, पावभाजी, मॅगी या व अशा पदार्थांवर ताव मारताना पर्यटक पाहावयास मिळत आहेत. महाबळेश्वरच्या गुलाबी थंडीची अनुभूती पर्यटक घेत असून, शाल मफलर कानटोपी असे उबदार वस्त्रे परिधान करून महाबळेश्वरच्या गुलाबी थंडीत फेरफटका मारताना दिसत आहेत. वेण्णालेक लिंगमळा परिसरात थंडीचे प्रमाण अधिक असल्याने धाबे रेस्टॉरंट्स बाहेर शेकोट्या पेटवून बसलेल्‍या लोकांचे चित्र पाहावयास मिळत आहेत.

रेस्टॉरंट्स सजली

दिवाळी सुट्टी च्या पार्श्वभूमीवर पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी येथील मुख्य बाजारपेठ सजली आहे. पर्यटक खरेदीसाठी बाजारपेठेत येतातच बाजारपेठेतील चप्पल, चणे, जाम, जेली, येथील प्रसिद्ध स्ट्रॉबेरी, चॉकलेट फज खरेदी करण्यासोबतच कडाक्याच्या थंडीत थंडगार आईसगोळ्यावर ताव मारताना पर्यटक दिसत आहेत.

बाजारपेठेतील आकर्षक वस्तू खरेदीकडे देखील पर्यटकांचा कल असल्याचे पाहावयास मिळत आहे. बाजारपेठेतील रेस्टॉरंट्स देखील दिवाळी निमित्त सजली आहेत. महाबळेश्वरमध्ये पर्यटनास येणारे पर्यटक सध्या गावाबाहेर झालेले हॉटेल्स, बंगलो, लॉजिंगला राहणे पसंत करीत यामुळे परंपरागत असलेले हॉटेल्स लॉजिंगसच्या धंद्यावर मात्र याचा परिणाम झाला आहे.

वाहतूक कोंडी नित्याचीच – पोलिस प्रशासनावर ताण

महाबळेश्वरमध्ये प्रवेश करीत असताना प्रामुख्याने वेण्णालेक येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागला. या तीन किमी च्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. केट्स पॉईंट ऑर्थरसीट सारख्या प्रमुख प्रेक्षणीय स्थळांवर देखील अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागत आहे.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news