सातारा : पुढारी वृत्तसेवा लहान मूल चिडचिड करत असल्याने त्यावर उपाय म्हणून मुलाला चटके देणे, गळ्याला घट्ट काळा दोरा बांधणे यासारखे अघोरी कृत्य करणार्या पाच जणांविरुद्ध जादूटोणा कायद्याअंतर्गत सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मेहबुब कादर अली, शमशुद्दीन मेहबुब अली, शमशुद्दीन कादर अली, मुमताज मेहबुब अली, फातिमा रसरफराज पठाण (सर्व रा. मिरज, जि. सांगली) यांच्याविरुद्ध सरफराज खलील पठाण (वय 42, रा. समर्थनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांना तीन मुले आहेत. यातील एक लहान मुलगा नेहमी चिडचिड करत असे. त्यामुळे त्यांची पत्नी मुलांना घेऊन काही दिवसांपूर्वी मिरजला गेली होती. त्यावेळी या सर्व मुलांचे टक्कल करण्यात आले. एका मुलाला सलग दोन दिवस मंत्रतंत्र करुन टांगले गेले. मिरजवरुन सातार्यात आल्यानंतर मोठ्या मुलीने हा प्रकार वडिलांना सांगितला.
लॉकडाऊनमध्ये मुलगा जास्तच चिडचिड करु लागला. यामुळे पठाण यांच्या पत्नीने वरील संशयितांच्या सांगण्यावरुन मुलाला चटके दिले. अशा प्रकारची अघोरी कृत्य वारंवार होऊ लागल्यानंतर पठाण यांनी वरील संशयितांविरोधात गुन्हा दाखल करावा, असा न्यायालयात अर्ज केला. या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
हेही वाचलंत का?