नाशिक : मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत वाहनांचे वितरण
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत बेरोजगारांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी आर्थिक सहाय्यातून वाहने वितरित करण्यात येत आहेत. लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करून स्वयंरोजगारातून प्रगती साधावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत रविवारी (दि.27) भुजबळ फार्म येथे पालकमंर्त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाहनांचे वितरण झाले. त्यावेळी भुजबळ बोलत होते. यावेळी माजी आमदार जयंत जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, कोंडाजी आव्हाड, दिलीप खैरे, नाना महाले, बाळासाहेब कर्डक, नगरसेवक जगदीश पवार, समाधान जेजुरकर आदी उपस्थित होते.
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीकडून राबविण्यात आलेला हा उपक्रम राज्यभरातील बेरोजगारांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना साडेतीन लाखांपर्यंत सबसिडी देण्यात येत असून, महाराष्ट्र बँकेच्या माध्यमातून अल्पदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. दोन वर्षे कोरोनामध्ये गेले असून, अनेकांनी रोजगारदेखील गमावला. त्यांना स्वयंरोजगरातून उभे राहण्यासाठी ही महत्त्वाची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटी बाळगून व्यवसायात सातत्य ठेवून प्रगती करावी, असे आवाहन भुजबळ यांनी केले.
योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक प्रकाश घुगे, खादी ग्रामोद्योगचे व्यवस्थापक श्रीमती भामरे, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक गणेश झा, समन्वयक सचिन पवार यांचे सहकार्य लाभले. यावेळी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

