सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा शहरासह जिल्ह्यात औषध दुकानदारांनी नोंदणीकृत डॉक्टरांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) असल्याशिवाय औषधे देवू नयेत. तशी बाब निदर्शनास आल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे. दरम्यान, मेडीकल दुकानदार रडारवर आल्याने खळबळ उडाली असून अन्न व औषध विभागाकडून कोणती कारवाई होणार? याकडे लक्ष लागले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना जागतिक महामारीचे संकट जगावर ओढावले आहे. अशातच आता पुन्हा गेल्या आठ दिवसांपासून सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. यामुळे ज्या पूर्वी चुका झाल्या किंवा ज्या उपाययोजना करणे गरजेच्या होत्या मात्र त्या राहून गेल्या त्याची आता दुरुस्ती होत असल्याचे समोर येत आहे. याचाच एक भाग म्हणजे कोरोना सदृश्य लक्षणे असतानाही अनेकजण अंगावर ते दुखणे काढत आहेत. यावेळी स्वत:सह कुटुंबियांना धोका निर्माण होतो. मात्र तोपर्यंत स्वत: असे रुग्ण मेडीकलमधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध घेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही औषधे मेडीकल दुकानदार देखील देत आहेत. यामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. अशा बाबींची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता जिल्हाधिकारी पुढे आले आहेत.
कोरोना संसर्गाबाबत मार्गदर्शनाप्रमाणे उपचार असल्यामुळे शेड्युल एच औषधे व स्टेरॉइड्स यांची विक्री नोंदणीकृत डॉक्टरांच्या चिठ्ठीवर होणे आवश्यक आहे. नागरिकांनी आजारी पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे उपचार घ्यावेत. दरम्यान, याबाबत कोणतीही हयगय होवू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी अन्न व औषध विभागाला दिल्या आहेत.
याबाबत औैषध विभागाच्या कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त मनिषा जवंजाळ-पाटील यांनी देखील भूमिका स्पष्ट केली आहे. स्टेरॉईडस्, गर्भपातावरील औषधे, अॅन्टीबायोटीक्स औषधे रुग्णांच्या तोंडी मागणीवर विक्री केली जावू नयेत. या सर्व पार्श्वभूमीवर औषध दुकानदारांच्या तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी औषध निरीक्षकांना दिले आहेत. नोंदणीकृत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित औषध दुकानदारांवर कठोर कारवाई करुन त्यांचे परवाने निलंबित करण्याचा इशारा जवंजाळ-पाटील यांनी दै.'पुढारी'शी बोलताना दिला आहे.
हेही वाचा: