मानवत; पुढारी वृत्तसेवा: मानवत तालुक्यातील कोथाळा शिवारात दुधना नदीच्या पात्रातील वाळू चोरून नेणाऱ्या वाळूमाफियांवर पोलिसांनी धाड टाकून तब्बल २१ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. नूतन पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (ता. ९ ) रोजी पहाटे ३ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, मानवत तालुक्यात गौण खनिजांची लूट मोठया प्रमाणात होत असून वाळूमाफीया सक्रिय आहेत. तालुक्यातील कोथाळा येथील शिवारात दुधना नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती येथील पोलीस ठाण्यात २ दिवसांपूर्वी रुजू झालेले नूतन पोलिस निरीक्षक दिपक दंतुलवार मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोडे, गजानन जंत्रे, राजू इंगळे यांच्या पथकाने रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दुधना नदीच्या पात्रात जावून धडक कारवाई केली.
पोलीस आल्याचे समजताच घटनास्थळावरून वाळू चोरट्यांनी पळ काढला. पोलिसांनी त्याठिकाणी वाळूने भरलेले नंबर नसलेले २१ लाख किमतीचे ३ ट्रॅक्टर व ट्रॉली व इतर साहित्य जप्त केले आहे.
यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात वाळूमाफियावर सहपोलीस उपनिरीक्षक गजानन जंत्रे यांच्या फिर्यादीवरून गौण खनिज अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास किशन पंतगे करीत आहेत.
हेही वाचा :