सातारा : पुढारी वृत्तसेवा एसटी महामंडळाच्या पुण्याच्या दापोडी कार्यशाळेने विशेष पर्यटन बस तयार केली असून तिचे छत संपूर्ण पारदर्शक असल्याने पर्यटकांना निसर्गाचा आनंद आधिक चांगल्या प्रकारे घेता येणार आहे. ही बस सातारा विभागाला देण्यात आली असून ती थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर आगारामध्ये पर्यटकांची सेवा करणार आहे.
रेल्वेमध्ये पारदर्शक छताचे विस्टाडोम कोच अलीकडेच दाखल झाले आहेत. त्याच धर्तीवर आता एसटी महामंडळाच्या दापोडी कार्यशाळेने ही विशेष पर्यटन बस तयार केली आहे. या बसमध्ये बाहेरील दृश्य दिसावे यासाठी पारदर्शक छताबरोबर इतरही बदल केले आहेत.प्रवाशांना दरवाजातून बाहेरचे निसर्ग सौंदर्य दिसावे यासाठी अतिरिक्त काच लावण्यात आली आहे. जास्त व्हिजन व प्रकाश रुफवर मध्यभागी मिळण्यासाठी समान अंतरावर टिंटेड कर्व्हड ग्लास लावली आहे.चालकाला ताजी हवा मिळण्यासाठी रुफ हॅच दिला आहे. पुढून पाठीमागे चढत्या क्रमाने प्रेक्षागृहासारखी प्रवासी बैठक रचना केल्याने सर्व प्रवाशांना समोरील बाजूनेप्रेक्षणीय स्थळे दिसतील. प्रत्येक आसनाला पर्स हूकची व्यवस्था केली आहे.
या बसच्या चारही बाजूला काचा आहेत. तसेच 42 आरामदायी खुर्च्या असून सीटजवळ चार्जिंग पाईंट आहे. अतिरिक्त साहित्यासाठी दोन कपाटे व एलईडी स्क्रीन ही बसची खास वैशिष्ट्ये आहेत. बसमध्ये पर्यटनस्थळांची माहिती देण्यासाठी विशिष्ट यंत्रणा उभारण्यात आली आहे. या बसवर महाबळेश्वर व प्रतापगडमधील विविध पॉईंट, धबधब्यांची आकर्षक चित्र रेखाटण्यात आली आहेत. त्यामुळे या पारदर्शी बसकडे पर्यटकांचा ओढा वाढणार आहे. या बसची सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकृत नोंदणी झाल्यानंतर लवकरच ही बस पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. ही बस पर्यटनासाठी महाबळेश्वर व प्रतापगड दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. महाबळेश्वर दर्शनासाठी 105 रुपये तर प्रतापगड दर्शनासाठी 115 रुपये तिकीट दर आकारण्यात येणार आहे.
सातारा एसटी विभागाच्या ताफ्यात एसटी महामंडळाने पारदर्शी बस दाखल केली आहे. या बसच्या माध्यमातून पर्यटकांना निसर्गाचा अनुभव घेता येणार आहे. त्यामुळे महामंडळ कायमच प्रवाशांच्या सेवेसाठी प्रयत्नशील राहिले आहे.
– सागर पळसुले, विभाग नियंत्रक सातारा
हेही वाचा;