

नवी दिल्ली : रोज एका लिंबूच्या सेवनाने आरोग्यासाठी अनेक प्रकारचे लाभ मिळू शकतात असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. लिंबूमधील 'क' जीवनसत्त्व, विरघळणारे फायबर आणि वनस्पतीजन्य घटक आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत. लिंबूच्या सेवनाने लठ्ठपणा, हृदयविकार, अॅनिमिया (रक्ताची कमतरता), मूतखडा आणि पचनाशी संबंधित समस्या दूर ठेवण्यास मदत मिळते.
लिंबूचे सेवन हे फॅटी लिव्हरची समस्याही दूर ठेवते. नैसर्गिकरीत्याच स्वच्छता करण्याचे त्याचे गुण (नॅचरल क्लिंजिंग) यकृतासाठी लाभदायक असतात. सकाळी कोमट पाण्यात लिंबूचा रस पिळून पिल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि पचनसंस्थाही चांगली राहते. लिंबूमुळे मूतखड्याची समस्याही दूर राहते.
लिंबूमध्ये सायट्रेटचे प्रमाण अधिक असते. हे सायट्रेट कॅल्शियम क्रिस्टल्स तयार होऊ देत नाही. लिंबूमुळे शरीरातील लाभदायक जीवाणूंना उत्तेजन मिळते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. लिंबूमध्ये 'पेक्टिन' नावाचे फायबर असते जे एक प्रीबायोटिक आहे. ते आरोग्यदायी बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणूंच्या विकासासाठी चालना देते. लिंबूमधील 'क' जीवनसत्त्व हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच त्वचेच्या आरोग्यासाठीही चांगले असते.