सातारा : पुढारी वृत्तसेवा ; वेळ दुपारी दीड वाजताची होती. सातारा शहर पोलिस ठाण्यासमोर आठ महिला अन् पाच पुरुष जमलेे. महिला संतापल्या होत्या, त्यांनी अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहत तोंडपट्टा सोडलेला. गडी मात्र 'हालत डुलत.' पोलिस मात्र लांबच थांबून. मुख्य रस्त्यावर रंगलेल्या या वगनाट्यामुळे प्रवासी नागरिक अवाक्. बघता बघता मुख्य हिरोने महिलेला बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली अन् मग पोलिसांची धावपळ अन् पकडापकडी सुरू झाली.
दो फुल अन् माली
त्याचे झाले असे. दुपारी दीड वाजता शहर पोलिस ठाण्यासमोरील एटीएम बाजून 15 जणांचा घोळका आला. सुरुवातीला महिलांमध्ये तणतण सुरू होती. ही तणातणी रस्त्यावर आली. त्यातून पुढे अशी माहिती आली की हे सर्वजण कोडोली येथून आलेले. एकमेकांचे पै-पाहुणे. त्यातून 'नाजूक विषयावरुन' हा आरडाओरडा सुरु असल्याचे शिव्यांवरुन परिसराला कळले. या स्टोरीमध्ये 'दो फुल अन् माली' असा मामला होता. यातील मुख्य हिरोला एकीने त्याच्या कॉलरला धरले होते. ती काही केल्या कॉलर सोडत नव्हती. तो मात्र कॉलर सोडण्यासाठी व गप राहण्याची विनंत्या करत होत्या. दुसरीकडे तिची हिरोईन कॉलर सोडण्यासाठी धडपडत होती. हा सर्व प्रकार परिसरातील नागरिक व शहर पोलिस लांबून बघत होते.
बुक्क्यांनी मारहाण, बघ्यांची गर्दी
कॉलर धरलेल्या महिलेकडून लै बोभाटा झाल्यावर मात्र हिरोची सटकली आणि त्याने महिलेला बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे आलेले 15 जण सगळेच एकदम 'चार्ज' झाले. मुख्य रस्त्यावरील या हाणामारीच्या प्रसंगाने अखेर शहर पोलिस अखेर 'अॅक्शन मोड'वर आले. हा कालवा सुरु असतानाच एलसीबीचे पोलिसही आले होते. एलसीबी व शहर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस पुढे सरसावल्या. महिला पोलिसांनी हाणामारी करणार्या महिलांना आवरायचा प्रयत्न केला. दुसरीकडे पुरुष पोलिसांनी हालणार्या डुलणार्यांच्या गचांडी धरली. या अभूतपूर्व प्रसंगामध्ये पोलिसांनी दोघा-तिघांना धरले व पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांमुळे कालवा करणारे शांत होतील, असे वाटले असताना उलटेच घडले. हाणामारी करणारे सगळेत पोलिस ठाण्यात घुसू लागले. तोपर्यंत बघ्यांची गर्दी वाढली. मुख्य रस्त्यावरील वाहने जाग्यावर थांबली. काही झाल्या पोलिसांना जमाव ऐकेना. पोलिसांची अक्षरश: केविलवाणी परिस्थती निर्माण झाले. अर्ध्या तासाहून अधिक वेळ घनशाघोळ सुरु होता. पोलिसांनी आणखी दोघा-तिघांना ताब्यात घेतल्यानंतर मग मात्र जमाव शांत झाला आणि हळूहळू तेथून काढता पाय घेवू लागला.
हेही वाचा :