जवळचे स्पष्ट दिसण्यासाठी आय ड्रॉप्स विकसित | पुढारी

जवळचे स्पष्ट दिसण्यासाठी आय ड्रॉप्स विकसित

वॉशिंग्टन :  ‘चाळिशी ओलांडली की चाळिशी ही लागतेच!’ हे खरे आहे. अनेकांना चाळिशीच्या आधीच चष्मा लागतो. सध्याच्या काळात तर मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरसारख्या साधनांमुळे लवकरच चष्मा लागत आहे. विशेषतः, जवळचे दिसण्यात अनेकांना समस्या असतात. वाचत असताना अक्षरे धुसर दिसतात आणि यासाठी चष्म्याची गरज भासते. मात्र, आता अमेरिकेत एक असा आय ड्रॉप्स विकसित करण्यात आला आहे, जो जवळचे दिसण्याची समस्या काही वेळापुरती दूर करू शकतो. या काळात चष्म्याची गरज संपुष्टात येते.

या नव्या औषधाचे नाव आहे ‘वुईटी.’ अमेरिकन औषध नियामक ‘एफडीए’ने त्याला मंजुरी दिली आहे. हे नवे औषध 15 मिनिटांमध्ये परिणाम दाखवते. डोळ्यात एक थेंब टाकल्यानंतर सहा ते दहा तास द़ृष्टी चांगली राहते. या औषधाच्या चाचणीत 750 लोक सहभागी झाले होते. त्यांनी सांगितले की, हे एखाद्या चमत्कारासारखेच होते.

रोचेस्टर युनिव्हर्सिटीच्या व्हिज्युअल सायन्स विभागाचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. स्कॉट एम. मॅकरेने यांनी सांगितले की, जे वाचत असताना चष्म्याचे ओझे सहन करू इच्छित नाहीत, त्यांच्यासाठी हा आय ड्रॉप्स चांगला पर्याय आहे. एका अंदाजानुसार, अमेरिकेत 45 वर्षांवरील 90 टक्के प्रौढांना द़ृष्टीची समस्या आहे. या स्थितीस ‘प्रेसबायोपिया’ म्हणतात. वयानुसार स्थिती बिघडत जाते. जवळच्या वस्तूंवर फोकस करण्यासाठी लेन्सचा आकार बदलला पाहिजे.

मात्र, वाढत्या वयासोबत त्याचा लवचिकपणा घटतो. यामुळे प्रक्रिया कठीण होते. ‘वुईटी’ औषध बाहुलीचा आकार छोटा करून जवळची द़ृष्टी चांगली करते. हे डोळ्यांच्या नैसर्गिक क्षमतांचा विस्तार करते. या औषधाच्या एका महिन्याच्या डोसवर सुमारे सहा हजार रुपये खर्च येईल.

Back to top button