न्यूयॉर्क : अंतराळाबाबत माणसाची स्वतःची अशी काही खास स्वप्ने आहेत. पृथ्वीशिवाय अन्यत्र मानवी वसाहत स्थापन करण्याचे स्वप्न तर अनेकांनी पाहिलेले आहे. अर्थातच, हे काम सहजसोपे नाही व त्यामध्ये धोकेही अनेक आहेत. आता संशोधकांनी म्हटले आहे की, माणसाने याबाबत आततायीपणा करून चालणार नाही. याचे कारण म्हणजे अंतराळात खाण्यापिण्याच्या वस्तूंबाबत अत्यंत मर्यादा येऊ शकते. अन्नाची इतकी कमतरता भासेल की, भूक लागल्यावर कदाचित माणसे एकमेकांना मारूनही खाऊ लागतील!
या स्थितीचे कारण म्हणजे अंतराळात पृथ्वीप्रमाणे पिकांचे उत्पादन घेणे अत्यंत कठीण आहे. अन्नधान्यांचे पीक नसणे किंवा ते नष्ट होणे, यामुळे अन्नाची टंचाई भासेल. एका वैज्ञानिक रिपोर्टमध्ये अंतराळात माणसासमोर कोणती आव्हाने असतील याची माहिती देण्यात आली आहे. अर्थात, वैज्ञानिकांना मंगळ किंवा चंद्रावर मानवी वसाहत स्थापन केली जाऊ शकते, अशी आशाही आहे.
याचे कारण म्हणजे चंद्र आणि मंगळ पृथ्वीपासून जवळ असल्याने तिथे पृथ्वीवरून आवश्यक सामग्री पाठवली जाऊ शकेल. जर तिथे अन्नाची टंचाई निर्माण झाली किंवा एखादी महामारी पसरली, तर पृथ्वीवरून मदतीची रसद पोहोचवली जाऊ शकते. मात्र, जर अंतराळात दूरवर मानवी वसाहत स्थापन केली, तर तिथेपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी अनेक वर्षांचा काळ जाऊ शकतो.
एडिनबर्ग युनिव्हर्सिटीतील अॅस्ट्रोबायोलॉजीचे प्राध्यापक चार्ल्स कॉकेल यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे पृथ्वीवर भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. अशावेळी अंतराळात वसाहत स्थापण्याचा पर्याय विचारात घेतला जाऊ शकतो. अर्थात, त्यापूर्वी सर्व स्तरावरील वैज्ञानिक चाचण्या घेतल्या जाणे गरजेचे आहे. असे पाऊल उचलणे हे अतिशय विश्वासार्ह व सुरक्षित असणेही गरजेचे आहे.