औरंगाबाद : पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेत बनावट देशी दारुचा कारखाना - पुढारी

औरंगाबाद : पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेत बनावट देशी दारुचा कारखाना

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : जिथे सैनिक व पोलिस घडविण्याचे प्रशिक्षण दिले जाते तेथेच बनावट देशी दारुचा कारखाना थाटल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी आडगाव बुद्रूक येथील जय जवान सैनिक, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेत छापा मारुन कारखाना उ केला. तसेच, १९ लाखांचा दारुसाठा जप्त केला आहे. २७ डिसेंबरच्या रात्री ही कारवाई करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आडगाव बु. येथे जय जवान सैनिक व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था आहे. कोरोना काळापासून ही संस्था बंद आहे. तेथे प्रशिक्षणार्थी नाहीत. परंतु, मुख्य सूत्रधार अशोक किसन डवले याने तेथे चक्क बनावट देशी दारुचा कारखाना उघडला. दहा ते पंधरा जणांना गोळा करुन तो मोठ्या प्रमाणात बनावट दारु बनवून बाजारात आणत असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यावरुन निरीक्षक शरद फटांगडे, जावेद कुरेशी, दुय्यम निरीक्षक भारत दौंड, गणेश पवार, सहायक दुय्यम निरीक्षक अशोक सपकाळ, जवान अनिल जायभाये, योगेश कल्याणकर, विजय मकरंद, किसन सुंदर्डे यांच्या पथकाने २७ डिसेंबरच्या रात्री तेथे छापा टाकला.

त्या ठिकाणी जितेंद्र सिंग, श्रीतेजभान सिंग, रवी सिंग, श्रीब्रिजबान सिंग, जयबली सिंग, श्रीबन्सराखन सिंग (सर्व रा. बरसेली जि. सिंधी, मध्यप्रदेश) यांच्यासह प्रशांत अनिल खैरनार (रा. धुळे), चैतन्य रामकृष्ण म्हैसकर (रा. बेगमपुरा) हे पाचजण देशी दारू टँगो पंच बनवत असताना मिळून आले.

त्यांच्याकडून चार इलेक्ट्रिक बॉटलिंग मशीनसह प्लास्टिक कॅन, स्पिरीट साठविण्याचे बॅरल तसेच इतर रॉ मटेरियल असा एकूण १९ लाख सात हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, औरंगाबादचे अधीक्षक सुधाकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने घटनास्थळी असलेल्या पाच जणांना अटक केली आहे. परंतु, मुख्य सूत्रधार अशोक किसन डवले व त्याचे अन्य नऊ साथीदार मात्र फरार झाले आहेत. या प्रकरणी मुंबई दारुबंदी कायदा 1949 च्या अजामिनपात्र कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास निरीक्षक जावेद कुरेशी करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button