वर्येत शेतकर्‍यांचा रास्ता रोको, डाव्या कालव्यावरील पुलाची मागणी | पुढारी

वर्येत शेतकर्‍यांचा रास्ता रोको, डाव्या कालव्यावरील पुलाची मागणी

कण्हेर; पुढारी वृत्तसेवा : गणेशनगर येथील कण्हेर डाव्या कालव्यावरील पुल झालाच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, पाटबंधारे विभागाचा धिक्कार असो, यासह अन्य मागण्यांसाठी वर्ये येथील (वर्येत शेतकर्‍यांचा रास्ता रोको) नागरिकांनी गावच्या शेजारील असलेल्या मुख्य रस्त्यावरील पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सुमारे एक तास वाहतूक ठप्प होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिस व आंदोलकांमध्ये आंदोलन स्थगित करण्याबाबत वादावादी झाली. अखेर संबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकारी मोटे यांनी जलद कालव्यावरील पूल बांधण्याबाबत आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

सातारा-पुणे या जुन्या हायवेवर वर्ये नजीक असलेल्या मार्गावरील कालव्याच्या पुलावर वर्येतील नागरिक मोठ्या प्रमाणावर जमा झाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्ते मुख्य रस्त्यावरील पुलावर ठाण मांडून बसले होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अटकाव केला. यावेळी पदाधिकारी व पोलिसांमध्ये वादावादी झाली. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हा लढा असून जोपर्यंत कालव्यावरील पूल बांधण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन स्थगित होणार नाही, अशी मागणी तेथील पदाधिकाऱ्यांनी केली.

त्यानंतर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी उठवण्याचा प्रयत्न केला. आंदोलनातील शेतकऱ्यांनी पोलिसांचे न ऐकता जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आंदोलक आक्रमक भूमिका घेत असल्याने पोलिस व पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी होऊन काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनामुळे येथील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाल्याने वाहनधारकांना वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाने जावे लागले.

यावेळी ज्येष्ठ नेते नथू निकम म्हणाले की, गणेशनगर वस्ती शेजारील असलेल्या गावच्या शिवारातून जाणारा डाव्या कालव्यावरील पूल गेली चार वर्षे पडून देखील पाटबंधारे विभागाने अद्याप लक्ष दिले नाही. या कालव्यावर पुल नसल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी लांब पल्ल्याचा अवलंब करावा लागत आहे. पुलाविना येथील वाहतूक बंद झाल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. याबाबत अनेकदा लेखी तक्रार देऊन देखील पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. तरी याची दखल घेऊन पाटबंधारे विभागाने त्वरित कालव्यावरील पूल बांधावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Gujarat High Court संतापले; तुम्ही कोण सांगणार मांसाहार करायचा नाही…

यावेळी रास्ता रोकोच्या ठिकाणी तालुका पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी व पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी देखरेख केली. यावेळी आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते नथू निकम, राजेंद्र निकम, सुरज जगताप, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष रमेश पिसाळ, शिवसेना तालुका अध्यक्ष सतीश ननावरे, माजी सरपंच विशाल ननावरे, सरपंच राहुल पोळ, बबन निकम, दिलीप पठारे, नवनाथ ननावरे, ग्रामपंचायत सदस्या सौ. रोहिणी जगताप, सौ. रेखा निकम, हणमंत जगताप, जगन्नाथ शिंदे, अभिजित पठारे, आनिल शिर्के, रामचंद्र निकम आदी सहभागी झाले होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button