सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपद निवडीवेळी आ. शशिकांत शिंदे यांनीच मला विरोध केला होता. पराभवाचे खापर फोडून सहानुभूती मिळवण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करत आहेत. स्व. अभयसिंहराजे यांच्या मंत्रिपदावेळी आ. शशिकांत शिंदे यांनी सहकारी आमदार म्हणून का शिफारस केली नाही? असा पलटवार आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, कितीही वातावरण तापवलं तरी त्यांना थंड करून घरी पाठवण्याची ताकत आमच्यात आहे, असा इशाराही आ. शिवेंद्रराजेंनी दिला.
जिल्हा बँक निवडणुकीत निवडून न आल्याने मला शिवेंद्रराजेंसाठी अध्यक्षपदासाठी शिफारस करता आली नाही त्यामुळेच ते अध्यक्ष झाले नसल्याची टीका आ. शशिकांत शिंदे यांनी आ. शिवेंद्रराजे यांच्यावर केली होती. या टीकेला शिवेंद्रराजे यांनी प्रत्त्युत्तर दिले. आ. शिवेेंद्रराजे म्हणाले, सहानुभूती मिळवण्यासाठी आ. शशिकांत शिंदे यांचे केविलवाणे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीवेळी पॅनेलच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत चेअरमनपद मला देण्यासंदर्भात चर्चा झाली होती. त्यावेळी मला एक किंवा दोन वर्षांसाठी चेअरमनपद नको. पाच वर्षांची टर्म देणार असला तर चेअरमन होतो, अशी भूमिका मी मांडली होती. त्यावेळी शशिकांत शिंदे यांनी पाच वर्षांचे कुणी बोलू नका, पुढं आपल्याला काय वेगळं करायला लागलं तर बघू, असे सांगितलं. त्यांची शिफारस हा त्यावेळी विषयच नव्हता ही वस्तुस्थिती आहे. उलट पाच वषर्र्े चेअरमनपद द्यायला शशिकांत शिंदे यांचीच हरकत होती.
उलट सहा वर्षे मला चेअरमनपद मिळाले. मला चेअरमनपदाला चिटकून राहायचंय किंवा हे पद मलाच पहिले आणि मीच तिथं पाहिजे, असा माझा बिलकूल अट्टाहास नाही. संधी मिळाली तर पुढील काळात आणखी चांगलं काम करु, अशी इच्छा होती.
संचालक, अधिकारी, कर्मचार्यांचीही मी चेअरमन व्हावे, अशी इच्छा होती. त्यामुळे शरद पवार, अजितदादा, रामराजे, बाळासाहेब पाटील यांच्याकडे मी इच्छा बोलून दाखविली. त्यांनी नितीनकाकांना चेअरमन करायचा निर्णय घेतला. मी त्यांचा निर्णय आडेवेढे न घेता लगेच मान्य केला. नितीन पाटलांच्या चेअरमनपदासाठी सूचक म्हणून माझी सही आहे. माझी राजकीय कारकिर्द चेअरमनपदावर चालत नाही. भाऊसाहेब महाराज कित्येक वर्षे जिल्हा बँकेत होते पण त्यांनी कधीही चेअरमनपदाची इच्छा व्यक्त केली नाही. पण, त्यावेळीही तालुक्यातील कामे व्हायची.
लक्ष्मणतात्या चेअरमन असताना मी संचालक होतो. त्यावेळीही माझी तालुक्यातील कामे होत होती. सर्वांनी आग्रह केल्यामुळे मी चेअरमनपदाची जबाबदारी घेतली. त्यावेळी मी पदाची मागणी केली नव्हती. त्यामुळे यावेळी पद मिळाले नाही म्हणून वाईट वाटण्याचे कारणच नाही. नितीनकाका आणि माझ्यात चांगली मैत्री आहे. नाराज असतो त्यांच्यासाठी सूचक झालोच नसतो. बँकेत चांगले काम करून दाखवल्याचा आनंद व अभिमान असेही ते म्हणाले.
शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, शशिकांत शिंदेचे वक्तव्य हे सहानुभूती मिळवण्यासाठी आहे. त्यांचा पराभव जावलीत झाला आहे. स्वत: केलेले राजकारण व गटबाजीतून त्यांचा पराभव झाला आहे. ठराव, सोसायट्या व त्याठिकाणी असलेला सचिव शशिकांत शिंदे यांच्या विचारांचा होता. त्यांचीच लोकं त्यांच्यासोबत का राहिली नाहीत, याचं शशिकांत शिंदे आत्मपरीक्षण करावं. पराभवाचं खापर माझ्यावर फोडणं हा चुकीचा प्रकार आहे. माझ्या चेअरमनपदाची त्यांना काळजी आहे तर, ज्यावेळी स्व. अभयसिंहराजे हे हक्कदार असतानाही त्यांना मंत्रिपद दिले गेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील ते ज्येष्ठ नेते असताना त्यांना डावलंं गेेले. त्यावेळी शशिकांत शिंदे यांनी भाऊसाहेब महाराजांसाठी सहकारी आमदार म्हणून किती प्रयत्न केले? भाऊसाहेब महाराजांना मंत्रिपद मिळावे म्हणून किती शिफारशी केल्या? भाऊसाहेब महाराजांमुळे मी आमदार झालो हे कधीही विसरणार नाही, असे इतरवेळी ते सांगतात. स्वार्थ येतो तिथेच भाऊसाहेब महाराजांचे नाव तुम्ही घेता. राष्ट्रवादीत कुरघोड्या झाल्या त्यावेळी भाऊसाहेब महाराजासांठी किती प्रयत्न केले? याचे उत्तर शशिकांत शिंदे यांनी द्यावे. धादांत खोटे वक्तव्य करून उगाच सातारा तालुक्यात आपली प्रतिमा तयार करण्यासाठी केविलवाणे प्रयत्न करू नका, असा इशारा त्यांनी दिला.
मी कुठेही लक्ष घातलेले नाही, मला पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी जावलीत गेलो, असे शशिकांत शिंदे सांगत आहेत, असे विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, तुम्ही पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडत होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे सौरभ शिंदे यांचा पराभव का झाला? त्यांच्याविरोधात कुणाच्या गटातील लोक होते. त्याच निवडणुकीत प्रवीण देशमाने यांना का पराभवाला सामोरे जावे लागले? त्यांच्याविरोधात कुणाची लोक होती? पंचायत समिती सदस्या अरुणा शिर्के यांच्याविरोधात अपात्रेची तक्रार कुणाच्या लोकांनी केली, याची उत्तरे शशिकांत शिंदे यांनी द्यावीत, असे आव्हानही आ. शिवेंद्रराजे यांनी दिले.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले, गटबाजी करायला त्यांना जावली तालुकाच का दिसतो? पक्ष वाढवण्यासाठी खटाव, माण, पाटण तालुक्यात जावा. याठिकाणी पक्षाचे उमेदवार पडले आहेत. जावलीतच का यायचे हे त्यांंचे पुढचे राजकारण समजण्याइतपत मला तेवढी अक्कल आहे. राजकारणात माझ्यापेक्षा ते पुढे आहेत असे त्यांना वाटत असले तरी 'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात,' याप्रमाणे शशिकांत शिंदे यांचा काय डाव आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची तिथली काय भूमिका आहे, हे मी चांगले समजू शकतो. त्यामुळे वेळीच आम्ही शहाणे झालो आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ऊस नेणार नाही, येवढ्या खालच्या पातळीवरचे राजकारण तुम्ही केले, असा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला आहे, असे विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, अजिंक्यतारा कारखान्याचे कार्यक्षेत्र सातारा तालुका आहे. अनेक वर्षे कारखाना तिकडून ऊस आणतो. अजिंक्यतारा कारखान्याला ऊस देवू नका, मी जरंडेश्वरला ऊस नेतो, टोळ्या आणून देतो, असे शशिकांत शिंदेच जावलीत लोकांना सांगत होते. त्या कारखान्याने त्यांना टोळ्या दिल्या नाहीत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा ऊस गेला नाही आणि ज्यांचा तिकडे ऊस गेला त्यांना पैसे मिळाले नाहीत, मग काय करायचे? कार्यकर्ते अंगावर यायला लागल्यावर अजिंक्यतारा ऊस नेत नाही म्हणून खापर फोडायचे. आजही अजिंक्यतारा कारखान्याच्या टोळ्या जावलीत आहेत, असे शिवेंद्रराजेंनी सांगितले.
चेअरमन व व्हाईस चेअरमनपदासाठी फॉर्म्यूला ठरला आहे का? असे विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, निवडीवेळी एकेक वर्षांसाठी पदाधिकार्यांची नावे जाहीर करत असल्याचे रामराजेंनी सर्व संचालकांना सांगितलं आहे. त्यामुळे या निवडी पुढील एक वर्षांसाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मी कुठे जावे, न जावे हे त्यांनी सांगायची गरज नाही. हा निर्णय मी व माझे कार्यकर्ते घेतील. आमची संघर्षाची तयारी आहे. ते पूर्वीही जावलीत लक्ष घालतच होते. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीतून लढणार्या रांजणेंच्या पत्नीविरोधात कुणाची लोकं विरोधात गेली? त्यावेळी शशिकांत शिंदे यांचीच माणसे विरोधात प्रचार करीत होती. त्यांची नावे मी जाहीर करू शकतो. ही गटबाजी झाली आहे. आगामी निवडणुका आम्ही ताकदीवर लढू. कितीही वातावरण तापवलं तरी त्यांना थंड करून घरी पाठवण्याची ताकत आमच्यात आहे, असा इशाराही त्यांनी दिला.