खोकल्याबरोबर रक्त येणे हे अनेक आजारांचे प्राथमिक लक्षण | पुढारी

खोकल्याबरोबर रक्त येणे हे अनेक आजारांचे प्राथमिक लक्षण

खोकला येणे हा काही खूप गंभीर आजार नक्कीच नाही. अनेकदा सर्दी किंवा घशातील संसर्ग यामध्ये खोकलाही येतो, पण खोकताना जर रक्त पडत असेल तर मात्र घाबरगुंडी उडते आणि ते साहजिकही आहे. मग खोकला हा देखील मोठा आजार असल्यासारखे वाटेल. असे पहिल्यांदाच झाले असेल तर आणि रक्त अगदी थोडेसेच असेल तर त्याकडे दुर्लक्षही करतो; पण खोकल्याबरोबर रक्त येणे हे अनेक आजारांचे प्राथमिक लक्षण असू शकते. त्याकडे दुर्लक्षही करता कामा नये. खोकल्याबरोबर रक्त पडणे हे अनेक आजारांचे संकेत असू शकतात.

सर्वसाधारण खोकला : खोकल्याबरोबर रक्त पडल्यास घाबरून जाऊ नका. काही वेळा सर्वसाधारण खोकला असतो आणि छातीचा संसर्ग आणि ब्रॉकायटिसमुळे तो जास्त वाढतो. या कारणांनी खोकल्यातून रक्त पडत असेल तर घाबरून जायचे कारण नाही. खोकताना रक्त पडल्यास वैद्यकीय सल्ला जरूर घेतला पाहिजे. छातीचा संसर्ग हा हवेतील विषाणूंमुळे होतो.

पल्मोनरी एम्बोलिजम : पल्मोनी एम्बोलिजम हा फुफ्फुसांशी निगडित एक धोकादायक विकार आहे. फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्याने हा आजार जडतो. या विकारामुळे खोकल्याबरोबर रक्त पडणे, छातीत तीव्र वेदना होणे आणि श्वास घेण्यास अडचण सारख्या समस्या निर्माण होतात.

जखमेमुळे किंवा कमी प्रमाणात चालणं या कारणांनी हात किंवा पाय यांच्या अशुद्ध रक्तवाहिन्यामध्ये रक्त साठून राहते त्या अवस्थेला ‘डीप व्हेन थ्रॉम्ब्रोसिस’ म्हटले जाते. ही अवस्था देखील पल्मोनरी एम्बोलिज्म असण्याचे शक्यता असल्याचे संकेत देते. जर पायाच्या शिरांमध्ये साठलेल्या रक्ताच्या प्रवाहावर योग्य पद्धतीने उपचार करून नियंत्रित न कल्यास हे रक्त प्राणघातकही ठरू शकते.

फुफ्फुसांचा कर्करोग : फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याने खोकल्यातून रक्त पडू शकते. जगभरात कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे आहेत. या कर्करोगाचे महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे धूम्रपान. फुफ्फसांच्या कर्करोगामध्ये पेशींची अनियंत्रित वाढ होते त्याची सुरुवात अन्ननलिकेपासून होते आणि नतंर संपूर्ण फुफ्फुसात त्याची लागण होते. फुफ्फुसांच्या कर्करोगाची इतर लक्षणे म्हणजे श्वास घेताना शिट्टी वाजल्यासारखा आवाज होणे, खोकताना रक्त पडणे किंवा तपकिरी रंगाची थुंकी बाहेर पडणे, सतत न्युमोनिया होणे किंवा श्वासनलिकेत सूज येणे, संसर्गजन्य रोगांची लागण होणे, चेहरा, हात, मान आणि बोटे यांना सूज येणे, वजन घटणे आणि भूक सातत्याने कमी होणे.

क्षयरोग : क्षयरोग हा संसर्गजन्य रोग आहे. जो जीवाणूंमुळे होतो. शरीराच्या सर्वच अवयवांमध्ये हा जीवाणू प्रवेश करू शकतो. अर्थात, हा जीवाणू फुफ्फुसांमध्ये जास्त प्रमाणात असतो. या आजारामुळे खोकल्याबरोबरच रक्त येण्याची समस्या दिसून येते. क्षयरोगाची इतरी काही लक्षणे असतात जसे तीन आठवड्यांपेक्षा अधिक खोकला, ताप (बहुतेककरून रात्री वाढणारा ताप), छातीत तीव्र वेदना, कफाबरोबर रक्त पडणे, श्वास घेण्यास त्रास, भूक कमी होणे इत्यादी.

पल्मोनरी एडिमा : पल्मोनरी एडिमा हा देखील फुफ्फुसांशी निगडित गंभीर आजार आहे. त्यात फुफ्फुसात पाणी होते. या रोगांमुळे खोकल्यातून रक्त पडते. पल्मोनरी एडिमा या आजारात अनेकदा फुफ्फुसाबरोबर हृदयावरही परिणाम होतो. ही परिस्थिती गंभीर असते. या विकारात फुफ्फुसात हवेऐवजी तरल पदार्थ भरतो त्यामुळे ऑक्सिजन रक्तात मिसळू शकत नाही आणि ऑक्सिजनचे शरीरातील प्रमाण कमी होते.

त्याच कारणामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. पल्मोनरी एडिमा या विकाराची अजूनही काही लक्षणे आहेत जसे श्वसनास त्रास, छातीत वेदना, कफाबरोबर रक्त, अचानक दम लागणे, थोड्या कामानेही दमून जाणे, त्वचेचा रंग निळा किंवा काळवंडणे, रक्तदाब कमी होणे.

डॉ. सुनीलकुमार जाधव

Back to top button