कुडाळ ; इम्तियाज मुजावर
संघर्षातून ज्याने विजय मिळवला आहे, कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भिडपणे निवडणूक लढवून विजयी झाले आहेत. अशा कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे व त्यांचे कौतुक करणे गरजेचे असते. यासाठीच मी जावळी तालुक्यात ज्ञानदेव रांजणे यांचं अभिनंदन करण्यासाठी आलो आहे असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. जावळी तालुक्यात आंबेघर येथे निवासस्थानी येऊन राष्ट्रवादीचे व भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक जिल्हा बँकेचे नूतन सदस्य ज्ञानदेव रांजणे यांचे अभिनंदन चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले.
राष्ट्रवादीचे कुसुंबी गटाचे जिल्हा परिषद सदस्य अर्चना रांजणे यांचे पती व भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांचा एक मताने पराभव केला होता.
त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज सकाळी साडेआठ वाजता ज्ञानदेव रांजणे यांच्या घरी येऊन निवडणुकीतील विजया बद्दल त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
यावेळी जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या सदस्य अर्चनाताई रांजणे यांनी भाजपच्या चंद्रकांत पाटील यांना औक्षण करत त्यांचे स्वागत केले. या सर्व घटनेमुळे जावळी तालुक्यात आणखीन एक नवा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे.
भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्या स्वागताला जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादीचे नेते जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांची प्रमुख उपस्थित होती, तर कुसुंबी जिल्हा परिषद गटातील बहुतांशी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकाच पॅनेलमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह शशिकांत शिंदे देखील होते. मात्र शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जावळी मध्ये येऊन ज्ञानदेव रांजणे यांचा जाहीर सत्कार केला. त्यांच्या विजयाच्या आनंदात संगीतावर दिलखुलास डान्स केला. या डान्सची संपूर्ण राज्यात चांगलीच चर्चा झाली. हा डान्स शशिकांत शिंदे यांना चांगलाच जिव्हारी लागला.
राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली. भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मदतीने राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव केल्याने ही लढत संपूर्ण राज्यात चांगलीच गाजली.
याची दखल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी देखील घेतली. यावर शशिकांत शिंदे यांची पत्रकार परिषद मोठ्या प्रमाणात गाजली, तर शिवेंद्रराजे भोसले यांनी या पत्रकार परिषदेचे उत्तर जशास तसे देत राजकारणामध्ये शशिकांत शिंदे यांना केव्हाही टक्कर देऊ असे आव्हान देखील दिले.
याच धर्तीवर राष्ट्रवादीच्या सातारा जिल्ह्याच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या स्पेशल किचन कॅबिनेट म्हणून ओळख असलेला आमदाराचा जिल्हा बँकेत पराभव केला. याचा आनंद साजरा करण्यासाठी दस्तुरखुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीच्या ज्ञानदेव रांजणे यांचे अभिनंदन करण्यासाठी जावळीत आले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे येण्याचे राजकीय उद्दिष्ट मात्र नेमके काय आहे तो येणारा काळच सांगेल, मात्र चंद्रकांत पाटील यांनी मी केवळ संघर्षातून विजय झालेल्या एका कार्यकर्त्याला शाबासकी व अभिनंदन करण्यासाठी आलो आहे. यात कोणताही राजकीय अर्थ नाही असे स्पष्ट केले आहे.
मात्र या घटनेने जावळी तालुक्यात आता नवी समीकरणे निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपच्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आगामी काळातल्या रणनीतीतून राष्ट्रवादीशी टक्कर देण्यासाठी जावळी तालुक्यात भाजप मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार हे मात्र दिसून येत आहे.
त्या पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत पाटील यांच्या या रणनीतीला जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे हे कशा पद्धतीने उत्तर देणार व या घटनेकडे कोणत्या नजरेने पाहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.