आदिवासी आशा वर्कर फोर्ब्सच्या यादीत | पुढारी

आदिवासी आशा वर्कर फोर्ब्सच्या यादीत

भुवनेश्वर ः वृत्तसंस्था 

ओडिशातील आदिवासी आशा स्वयंसेविका मतिल्दा कुल्लू (वय 45) यांचा जगप्रसिद्ध फोर्ब्स या नियतकालिकाने जगातील सर्वाधिक प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश केला आहे.

सुंदरगड जिल्हातील बडागाव तालुक्यातील गर्गडबहल गावच्या रहिवासी असणार्‍या कुल्लू गेल्या 15 वर्षांपासून आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत आहेत. कुल्लू यांनी जनजागृती करून या भागातील काळ्या जादूसारख्या सामाजिक समस्येचे समूळ उच्चाटन केले आहे.

त्यांच्या या कार्याचा गौरव करत फोर्ब्सने प्रसिद्ध बँकर अरुंधती भट्टाचार्य आणि अभिनेत्री रसिका दुग्गल यांसारख्या प्रतिभावान महिलांच्या बरोबरीने 2021 च्या यादीत कुल्लू यांचा समावेश केला आहे. कुल्लू यांच्या दैनंदिन कामाची सुरुवात पहाटे पाच वाजल्यापासून होते.

कुटुंबातील चार लोकांची जबाबदारी सांभाळणार्‍या कुल्लू घरकाम आवरून सायकलवरून आशा स्वयंसेविकेच्या कार्यासाठी घराबाहेर पडतात. गावातील प्रत्येक घरात जाऊन कोरोना लसीकरण, प्रसूतीपूर्व तपासणी, प्रसूतीनंतरची तपासणी, स्तनपान, महिलांच्या विविध समस्या आणि कोरोना संसर्गाबाबत जनजागृतीचे काम त्या करतात.

मतिल्दा म्हणाल्या की, कोरोना महारोगराईनंतर माझी जबाबदारी आणखीनच वाढली. कोरोनाची लक्षणे असणार्‍या लोकांच्या तपासणीसाठी रोज गावातील 50 ते 60 घरांत जावे लागत असे. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर आणि कोरोना लसीकरण करण्यासाठी लोकांना मला खूप समजावून सांगावे लागले. सध्या दरमहा 4 हजार 500 रुपये पगार मिळतो. मी माझ्या कामात आनंदी आहे.

Back to top button