कराडात भाजपचे सहकार मंत्र्यांना सहकार्याचे ‘बळ’ ! बाळासाहेब पाटलांना उघड पाठिंबा

बाळासाहेब पाटील
बाळासाहेब पाटील
Published on
Updated on

सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या कराड तालुका सोसायटी गटात राज्याचे सहकार मंत्री, राष्ट्रवादीचे नेते नामदार बाळासाहेब पाटील आणि काँग्रेस नेते, जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे. दोन्ही गटांनी सहलीवर पाठवलेले मतदार रात्री उशिरा कराडमध्ये दाखल झाले. त्यानंतर सकाळी मतदानाला सुरुवात होताच दोन्ही गटाच्या मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्रावर रांगा लावल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.

दरम्यान भाजपाचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्यासोबत त्यांच्या समर्थक मतदारांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना उघडपणे पाठिंबा दिल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

बिनविरोधसाठी सर्व चर्चा निष्फळ

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकत राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांचे सुपूत्र ॲड. उदयसिंह पाटील यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत आणि अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत कराड तालुका सोसायटी गटातून नामदार बाळासाहेब पाटील हे बिनविरोध व्हावे यासाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह ॲड. उदयसिंह पाटील यांच्याशी चर्चा करत होते. सर्व चर्चा निष्फळ ठरल्या आणि दोन्ही नेते आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने कराड तालुका सोसायटी गटाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

दोन्ही गटांकडून संभाव्य घोडेबाजार लक्षात घेत मतदारांना सहलीवर पाठवले होते. नामदार बाळासाहेब पाटील यांचे समर्थक मतदार रात्री उशिरा कराडमध्ये दाखल झाले. सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रिया सुरू होताच नामदार पाटील समर्थक मतदार मतदान केंद्रांवर पोहोचले होते.

त्याचवेळी सकाळी साडेसातच्या सुमारास ॲड. उदयसिंह पाटील समर्थक मतदार शिवाजी विद्यालयानजीक दाखल झाले होते. सकाळी नऊ वाजेपर्यंत कराड तालुक्यात 332 मतदारांपैकी बहुतांश मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

राष्ट्रवादीसह भाजप समर्थक मतदार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील त्यांच्या पाठीशी असताना काँग्रेस समर्थक मतदार ॲड. उदयसिंह पाटील त्यांच्या पाठीशी असल्याचे पहावयास मिळत आहे.

दरम्यान, सकाळी आठनंतर भाजप नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्यासोबत यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले, पैलवान धनाजी पाटील यांच्यासह भाजप समर्थक मतदार थेट नामदार बाळासाहेब पाटील समर्थकांनी शिवाजी हायस्कूललगत उभारलेल्या पेंडॉलमध्ये दाखल झाले. यावेळी जशराज पाटील, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांच्यासह नामदार पाटील कुटूंबीय तसेच प्रमुख पदाधिकारी यांच्याशी डॉ. अतुल भोसले यांनी चर्चा केली. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे भाजप नेते डॉक्टर अतुल भोसले यांनी सांगितले.

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news