सातारा जिल्हा बँक : आज हाय व्होल्टेज ड्रामा; मतदान केंद्रांवर तगडा बंदोबस्त | पुढारी

सातारा जिल्हा बँक : आज हाय व्होल्टेज ड्रामा; मतदान केंद्रांवर तगडा बंदोबस्त

सातारा; पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्हा बँक : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठीचा संघर्ष आता टोकाला पोहोचला असून रविवारी सर्व तालुक्यात घमासान होणार आहे. विशेषत: सोसायटी मतदारसंघांत थरार निर्माण झाला असून मतदार पळवापळवी झाली आहे. हे मतदार आज थेट मतदान केंद्रांवरच दाखल होणार असल्याने या ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळणार आहे. बँकेच्या 10 जागांसाठी अत्यंत चुरस निर्माण झाली आहे. मतदानासाठी सर्व केंद्रावर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.

सातारा जिल्हा बँकेसाठी रविवार, दि. 21 नोव्हेंबर रोजी 11 केंद्रांवर मतदान होत आहे. सातारा जिल्हा बँकेसाठी 21 संचालकांच्या जागा असून त्यासाठी 1964 मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सातारा जिल्हा बँकेसाठी 11 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता उर्वरित 10 जागांसाठी आज धूमशान होणार आहे. आजच सर्व उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद होऊन तो पेटारा मंगळवारी उघडणार आहे.

कराड सोसायटी, पाटण सोसायटी, कोरेगाव सोसायटी, जावली सोसायटी, माण सोसायटी, खटाव सोसायटी, इतर मागास प्रवर्ग, नागरी सहकारी बँका व पतसंस्था व महिला प्रतिनिधी या मतदारसंघांत घमासान होत आहे. यामध्ये सर्वच सोसायटी मतदारसंघांत तुल्यबळ उमेदवार असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.

मतदानासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिल्याने ग्राऊंड लेव्हलला घडामोडींना वेग आला आहे. जो तो उमेदवार निवडून येण्यासाठी प्रत्येक हातखंडे वापरू लागला आहे. यातूनच मतदारांची पळवापळवी व उचला उचली होत आहे. प्रचार संपल्याने मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांशी कॉनटॅक्ट करण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केला.

काही सोसायाट्यांमध्ये मतदार पळवा पळवी

सर्वच सोसाट्यांमध्ये काँटे की टक्कर होणार असल्याने बहुतांश उमेदवारांनी आपले मतदार हे अज्ञातस्थळी नेवून ठेवले होते. मतदान जवळ आल्याने या मतदारांना जिल्ह्यात सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. हे सर्व मतदार रविवारी थेट मतदान केंद्रावर येणार आहेत. यासाठी उमेदवारांकडून मायक्रो प्लॅनिंग होत आहे. त्यासोबतच काही दगा फटका होवू नये याचीही काळजी घेतली जात आहे. काही सोसायाट्यांमध्ये मतदार पळवीसाठी उमेदवारांकडून साम, दाम, दंड व भेद या नीतीचा वापर केला जात आहे. त्यामुळे तालुक्यांमधील वातावरण तंग झाले आहे.

फोडाफोडीला वेग आल्याने उमेदवारांकडून एकमेकांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर वॉच ठेवण्यात येत आहे. सोसायटीची निवडणूक लागलेल्या तालुक्यांमध्ये हाय व्हाटेल्टेज ड्रामा होणार असल्याने प्रशासकीय व पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. विशेषत: जावली, कराड, माण व खटाव हे तालुके पोलिसांच्या रडारवर आहेत. वरिष्ठ अधिकारी जातीने लक्ष ठेवून आहेत. मतदानादिवशी राडा होण्याची शक्यता गृहीत धरून मतदान केंद्रांसह तालुक्यातील संवेदनशील परिसरात तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

हेही वाचलत का?

Back to top button