सातारा : ढगाळ हवामानाचा स्ट्रॉबेरी, गव्हाला फटका | पुढारी

सातारा : ढगाळ हवामानाचा स्ट्रॉबेरी, गव्हाला फटका

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा

गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे उभ्या पिकांना रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. यामुळे स्ट्रॉबेरी बागायतदार शेतकर्‍यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा तसेच स्ट्रॉबेरी व इतर बागायती पिकांवर परिणाम दिसू लागला आहे.

स्ट्रॉबेरीसह टोमॅटो व इतर बागायती पिके यांच्यावर रोगाचे प्रमाण वाढू लागले आहे. ढगाळ वातावरणामुळे स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. यावर किडीचे प्रमाण वाढू लागले आहे. लहान लहान कीटक दिसू लागल्याने कीटकनाशके मारण्यावाचून शेतकर्‍यांकडे पर्याय नाही. कीटकनाशके आणि बुरशीनाशकाचा खर्च वाढणार असल्याने मोठा आर्थिक फटका शेतकर्‍यांना बसणार आहे. गहू पिकावरही ढगाळ वातावरणामुळे रोग पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उगवून आलेल्या हरभर्‍यावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकर्‍यांनी वर्तवली आहे.

हरभर्‍याचे क्षेत्रही यावर्षी जावली तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहे तर तालुक्यात कांद्याची लागवडही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याशिवाय कांद्याच्या रोपांवरही या हवामानाचा परिणाम होणार आहे.स्ट्रॉबेरीला सध्या फळधारणा होऊ लागली आहे. पडलेला पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे स्ट्रॉबेरीचे पीक हे नाजूक असल्याने स्ट्रॉबेरी फळांवर मोठ्या प्रमाणात परिणाम दिसू लागला आहे.

महाबळेश्वर, पाचगणी, भिलार यांच्या तुलनेत जावली तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रॉबेरीची लागण करण्यात आली आहे. सध्या स्ट्रॉबेरीला अडीचशे ते तीनशे रुपये प्रतिकिलो दर मिळू लागला आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे स्ट्रॉबेरीला फटका बसण्याची शक्यता आहे. हातातोंडाला आलेले स्ट्रॉबेरीचे पीक जर अवकाळी पाऊस पडला तर वाया जाण्याची भीती आहे.

Back to top button