

जिल्हा बँकेसाठी रविवारी चुरशीने मतदान होणार असून त्यासाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. 21 पैकी 11 जागा बिनविरोध निवडून आल्या असून, 10 जागांसाठी टस्सल होणार आहे. रविवारी सकाळी 8 ते 5 या वेळेत त्या – त्या तालुक्यांच्या ठिकाणी मतदान होणार आहे. जिल्ह्यात एकूण 1964 मतदार असून, सहा सोसायटी मतदारसंघातील लढतींकडे राज्याचे लक्ष वेधले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदानासाठी प्रशासनाकडून सर्व कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्यांची कार्यशाळा घेण्यात आली. मतदानासाठी आवश्यक साहित्य त्या-त्या केंद्रावर शुक्रवारी पोहोच करण्यात आले. मतदानासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी मतदान केंद्रे उभारण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेवर 6 पथके नजर ठेवणार आहेत.
प्रत्येक मतदान केंद्रांवर सहकार विभागाचे 8 कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. प्रत्येक दोन केंद्रांवर 7 कर्मचारी असलेले एक पथक निगराणी ठेवणार आहे.मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवर होणार आहे.यामध्ये प्रत्येक मतदारसंघनिहाय वेगवेगळ्या रंगाची मतपत्रिका मतदारांना मिळणार आहे. सोसायटीसाठी पांढरी, महिला प्रतिनिधीसाठी गुलाबी, इतर मागास प्रवर्गासाठी पिवळी व नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघासाठी फिक्कट हिरव्या रंगाची मतपत्रिका देण्यात येणार आहे.
सोसायटी मतदार संघांसह उरलेल्या पतसंस्था, महिला, ओबीसी या मतदार संघांचे मतदानही त्या – त्या तालुक्यातच होणार आहे. दरम्यान, पोलिस यंत्रणेकडून प्रत्येक केंद्रावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. माणमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा किंवा वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवू नये यासाठी दहिवडीत मतदानादिवशी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
त्याअनुषंगाने रविवारी दहिवडी शहरातील फलटण चौक ते सिध्दनाथ मंदिर पर्यंतचा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यासाठी दहिवडीवरुन म्हसवडकडे जाण्याकरता स्टँडपाठीमागून सिध्दनाथ मंगल कार्यालयाच्या जवळून खांडसरी चौक ते गोंदवलेमार्गे म्हसवड व दहिवडीकडून म्हसवड असे दोन्ही रस्ते सुरू राहणार आहेत. याचबरोबर दहिवडीकडून राणंद बाजूकडे जाण्यासाठी दहिवडी ते फलटण रोडमार्गे शिंगणापूर तिकाटनेमार्गे राणंदकडे जाता येणार आहे.
सोसायटी मतदारसंघ
जावली 49
कराड 140
कोरेगाव 90
खटाव 103
माण 74
पाटण 103
ना. सह.बँका व पतसंस्था 374
महिला प्रतिनिधी 1964
इतर मागास प्रवर्ग 1964
https://youtu.be/AKuoLpW0oO4